आधारतीर्थातील मुलांसाठी होणार शाळा
By Admin | Published: November 14, 2015 10:58 PM2015-11-14T22:58:42+5:302015-11-14T22:59:28+5:30
आधारतीर्थातील मुलांसाठी होणार शाळा
नाशिक : आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना निवारा देणाऱ्या त्र्यंबकेश्वरजवळील आधारतीर्थ आश्रमात आता या मुलांसाठी शाळा सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ज्या शेतकरी माता-पित्यांनी आत्महत्त्या केली आहे, अशा अनाथ मुलांचा सांभाळ आधारतीर्थ येथे केला जातो. आज मितीस येथे सुमारे शंभर मुले शिक्षणाच्या प्रवाहात येतील अशी आहेत. याशिवाय अनाथ झालेल्या शेतकरी कुटुंबातील एक हजार मुलांची येथे स्थलांतरित करण्याची मागणी आहे सध्या ही मुले गावात पडेल ते काम करतात. त्यामुळे या मुलांना येथे सामावून घेतले तर त्यांच्या शिक्षणाचा आणि त्या अनुषंगाने भविष्यात रोजगाराचा प्रश्न सुटू शकणार आहे. मराठा महासंघाच्या वतीने यासंदर्भात पुढाकार घेण्यात आला. मुंबईत मराठा महासंघाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात स्थानिक संघाचे कार्यकर्ते चंद्रकांत बनकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी या मुलांना वारकऱ्याचा वेश करून सहभागी करून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमात सर्वांनीच शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांच्या व्यथा मांडल्या. यावेळी मराठा महासंघाने मुलांसाठी शाळा सुरू करण्याची मागणी केली. ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली, असे चंद्रकांत बनकर यांनी सांगितले. सदरच्या शाळेसाठी सेवानिवृत्त अभियंता चव्हाण, कमलेश पिंगळे, सचिन पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले.