पुनर्चाचणीशिवाय सुरू होणार शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:11 AM2020-12-23T04:11:37+5:302020-12-23T04:11:37+5:30
शासन निर्देशानुसार शाळेत प्रवेशासाठी पालकांचे संमतिपत्र अनिवार्य आहे, त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी प्रत्यक्षात किती विद्यार्थी शाळेत येतील, याविषयी ...
शासन निर्देशानुसार शाळेत प्रवेशासाठी पालकांचे संमतिपत्र अनिवार्य आहे, त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी प्रत्यक्षात किती विद्यार्थी शाळेत येतील, याविषयी प्रश्नचिन्ह असल्याने याविषयी नियोजन करण्यासाठी शिक्षण उपसंचालक नितीन उपासणी यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर व महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासोबत शाळा सुरू करण्याविषयी ऑनलाइन संवाद साधला. यात शाळांचे वर्ग आणि परिसर स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, शिक्षकांची कोविड चाचणी याविषयी चर्चा केली. त्यानुसार, यापूर्वी चाचणी झालेल्या शिक्षकांची आवश्यकतेनुसार शिक्षकांची चाचणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात यापूर्वी २३ नोव्हेंबरला शाळा सुरू करण्याची घोषणा कारण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास साडेनऊ हजार शिक्षकांची आरटीपीसीआर ॲन्टिजन टेस्ट करण्यात आली होती. त्यात शिक्षक व शिक्षकेतर असे मिळून सुमारे ३८ कर्मचारी कोरोनाबाधित निघाल्याने तसेच दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या भीतीने ऐनवेळी शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता ४ जानेवारीला शाळा सुरू होणार असल्या तरी गेल्यावेळी केलेल्या शिक्षकांच्या चाचण्यांना जवळपास महिनाभराचा कालावधी उलटल्याने अशा शिक्षकांची पुनर्तपासणी होणार काय, याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. या संभ्रम अखेर संपुष्टात आला आहे. याविषयी आणखी सूक्ष्म नियोजन करण्यासाठी मंगळवारी (दि. २२) शहरांतील शाळांसदर्भाच महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार आहे. तर बुधवारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार असल्याचेही नितीन उपासणी यांनी सांगितले.