शाळेचे काम पंधरा हजारांचे, बिल दीड लाखांचे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 08:17 PM2019-08-01T20:17:35+5:302019-08-01T20:18:36+5:30
दिंडोरी तालुक्यातील जुने धागुर हे गाव पूर्णत: आदिवासी असल्यामुळे ते पेसा अंतर्गत मोडले जाते. शासनाकडून पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जातो.
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : नाशिक व दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जुने धागुर गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीत ग्रामसेवकाच्या मदतीने ठेकेदाराने मोठ्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला असून, पंधरा हजार रुपयांचे काम असताना ठेकेदाराने दीड लाख रुपये खर्च दाखविल्याने ठेकेदाराला रक्कम अदा करण्यास सदस्यांनी विरोध दर्शविला आहे.
दिंडोरी तालुक्यातील जुने धागुर हे गाव पूर्णत: आदिवासी असल्यामुळे ते पेसा अंतर्गत मोडले जाते. शासनाकडून पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जातो. गावातील प्राथमिक शाळा सध्या पावसाळ्यात गळत असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे हाल पाहता ती दुरुस्त करावी, अशी गावकऱ्यांची मागणी होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने पेसा अंतर्गत प्राप्त रकमेतून शाळा दुरुस्तीसाठी दीड लाखाच्या कामाला मंजुरी दिली व त्याचा रीतसर ठेका देण्यात आला. संपूर्ण शाळेची दुरवस्था झालेली असताना ठेकेदाराने सर्वच कामे करणे अपेक्षित असताना त्याने एकाच दिवसात शाळेच्या छतावर पंधरा सीमेंटचे पत्रे टाकले. त्याचे दीड लाखाचे बिल ग्रामपंचायतीला दिले. मुळात पंधरा पत्र्यांची किंमत साडेसात हजार होत असून, मजुरी धरून पंधरा हजार रुपये होत असताना ग्रामसेवकाने दीड लाखाचे बिल मंजूर करून रकमेचा धनादेश कसा काढला असा सवाल पेसा अध्यक्ष चंदर तात्या ढोले यांनी उपस्थित केला आहे. कामाचे बिल मिळावे म्हणून ठेकेदाराने राजकीय दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र ग्रामस्थांनी शाळेच्या कामाबद्दल आक्रमक पवित्रा घेतला असून, काम पूर्ण दीड लाखाचे करा अन्यथा धनादेश देण्यास विरोध दर्शविला आहे.
---