निळवंडीत बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 02:45 AM2022-06-21T02:45:12+5:302022-06-21T02:45:57+5:30

दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात सोमवारी (दि. २०) दहा वर्षीय शाळकरी बालकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.

Schoolboy killed in leopard attack in Nilwandi | निळवंडीत बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलाचा मृत्यू

निळवंडीत बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलाचा मृत्यू

googlenewsNext

दिंडोरी : तालुक्यातील निळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात सोमवारी (दि. २०) दहा वर्षीय शाळकरी बालकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.

दिंडोरी तालुक्यात अनेक गावांमध्ये बिबट्यांची दहशत निर्माण झाली असून बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. सोमवारी सायंकाळी निळवंडी येथील करण मच्छिंद्र गवारी हा जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीत शिकणारा विद्यार्थी शाळा सुटल्यावर वस्तीवरील आपल्या घरी चार-पाच मित्रांसोबत इमानवाडी परिसरात वाघाड कॅनॉलजवळून जात होता. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यावर झडप घालत त्यास झुडपात नेले. इतर विद्यार्थ्यांनी घाबरून मदतीसाठी आरडाओरड करायला सुरुवात केली. आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेत करणला बिबट्याच्या तावडीतून सोडवले, मात्र बिबट्याच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वनविभागाने तसेच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार आहे. यापूर्वी दिंडोरी तालुक्यातील म्हेंळुस्के, लखमापूर, परमोरी येथे बालकांवर बिबट्याने हल्ला करत त्यांचा बळी गेला होता. या घटनेने दिंडोरी तालुक्यात घबराट पसरली असून वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

 

इन्फो

रक्ताचे थारोळे; अस्ताव्यस्त दप्तर

नुकत्याच शाळा सुरू होत शाळेतून पाठीवर दप्तर घेत परतणाऱ्या करण यास बिबट्याने वाघाड कालव्यालगत हल्ला करत बाजूला झुडपात नेले. शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले, मात्र करण बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. बाजूला रक्ताचे थारोळे साचले अन् येथे दप्तरही अस्ताव्यस्त पडले. त्यात नव्याने घेतलेला बॉलपेन रक्ताने माखत पडला होता. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश बघून अनेकांचे मन हेलावले.

Web Title: Schoolboy killed in leopard attack in Nilwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.