पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार ; मुलांना पाठविण्यास पालकांमध्ये धाकधुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:13 AM2021-01-17T04:13:39+5:302021-01-17T04:13:39+5:30
नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, कोरोना लसीकरणालाही जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे ४ जानेवारीपासून ...
नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, कोरोना लसीकरणालाही जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे ४ जानेवारीपासून शहरासह जिल्हाभरात सुरू करण्यात आलेल्या नववी ते बारावीच्या वर्गांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरू झालेल्या शाळांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याने शासनाने पाचवी ते आठविच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षण विभागानेही शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे, नववी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन पंधरवडा उलटला असून, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि कोरोनाचा कमी झालेला प्रभाव लक्षात घेऊन शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात येत आहे.
पॉईंटर-
जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या
पाचवी - १,२२,७४३
सहावी - १,२०,६४५
सातवी - १,१८,३३२
आठवी - १,१५,९१०
जिल्ह्यातील शाळा - ५६२६
जिल्ह्यातील शिक्षक -१२, ३२४
इन्फो-
नववी ते बारावीचे वर्ग सुरू झालेल्या शाळांमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असे शिक्षण विभागाकडून व्यक्त होत आहे. त्यामुळेच यासंदर्भात शासनाचा निर्णय जाहीर होताच शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.
कोट-१
शैक्षणिक वर्ष पूर्ण होत आले असताना शाळा सुरु करण्याची घाई कशासाठी ? शासनाने लसीकरण पूर्ण होऊन द्यावे. त्यानंतर पाचवीपासूनचे वर्ग सुरू करणे आवश्यक आहे.
-विलास पवार, पालक
कोट-२
कोरोनाची लस आली आहे तर प्रथम लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. तसेच शैक्षणिक वर्षही पूर्ण होत आले आहे. त्यामुळे आता पुढील वर्षातच शाळा सुरू करणे आवश्यक आहे.
- राजेश जाधव, पालक
कोट-३
लस आली असली तरी कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे संपला नाही, त्यामुळे लसीकरणानंतरच शाळा सुरू करण्याचे नियोजन होणे आवश्यक आहे. पाचवीचे विद्यार्थी शाळांमध्ये सुरक्षाविषयक काळजी घेऊ शकतील का याचा विचार होणे आवश्यक आहे.
-सुभाष पाटील,पालक
कोट -
शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. नववी ते बारावीच्या वर्गांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे पाचवी ते आठवीच्या वर्गांनाही मिळण्याची अपेक्षा आहे.
- नितीन उपासणी, शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग
(फोटो-०४पीएचजेएन६२)