कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नयेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 06:01 PM2020-10-27T18:01:31+5:302020-10-27T18:02:08+5:30
इगतपुरी : जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये या मागणीसाठी नाशिक जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजीव म्हसकर यांना निवेदन देण्यात आले.
इगतपुरी : जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये या मागणीसाठी नाशिक जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजीव म्हसकर यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात राज्यातील जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे समायोजन नजीकच्या शाळेत करण्याची कार्यवाही दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे लहान शाळा, वस्ती शाळा तसेच दुर्गम भागातील शाळा बंद होऊन वंचितांचे शिक्षण बंद होणार आहे.
त्यामुळे या निर्णयाला नाशिक जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांचा विरोध आहे. नाशिक जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत. असे झाल्यास या निर्णयाविरोधात सर्व प्राथमिक शिक्षक संघटना आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला. तसेच याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षण सभापती यांनाही देण्यात आले.
या निवेदनावर शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष केदु देशमाने, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आर. के. खैरनार, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष .आनंदा कांदळकर, शिक्षक संघाचे सरचिटणीस अर्जून ताकाटे, शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनवणे, शिक्षक समितीचे राज्य पदाधिकारी संजय पगार, नंदु आव्हाड, शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष बाजीराव सोनवणे, विनायक ठोंबरे, दिपक सोनवणे, धनंजय आहेर, हेमंत अहिरे, विश्र्वास भवर तसेच पदवीधर संघटनेचे अंबादास अहिरे, महारू निकम यांचे सह विविध पदाधिकारी उपस्थित होते.