कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू कराव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:17 AM2021-08-12T04:17:57+5:302021-08-12T04:17:57+5:30
पेठ- नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये योग्य भौतिक व आरोग्य सुविधा उपलब्ध करून व १०० टक्के शिक्षकांचे लसीकरण करून ...
पेठ- नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये योग्य भौतिक व आरोग्य सुविधा उपलब्ध करून व १०० टक्के शिक्षकांचे लसीकरण करून नियमित शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
महाराष्ट्र राज्यप्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या नेतृत्वाखाली निवासी जिल्हाधिकारी नाशिक यांना जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू करण्यासंदर्भाने निवेदन देण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोवि चे वातावरण हे सद्य:स्थितीत कमी झालेले आहे. जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये कोविडचे वातावरण नाही. अशा ठिकाणी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचे १०० टक्के कोविड लसीकरण करूनच शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. यामध्ये ऑनलाइन शिक्षण अध्यापन करताना काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण होऊन मुलांना १०० टक्के सहभागी होता येत नाही व अध्यापन करणे कठीण होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. ग्रामीण भागातील शाळा व त्या ठिकाणची परिस्थिती बघून व संपूर्ण विद्यार्थ्यांचे लसीकरण करून शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी निवासी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा मुख्य आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. प्रत्येक तालुका संघ कार्यकारिणीने आपापल्या तालुक्यातील तहसील, प्रांत, आरोग्य,
शिक्षण विभाग यांना विद्यार्थ्याचे लसीकरण करून शाळा सुरू करण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन तालुकास्तरावर देऊन विनंती करण्यात येणार आहे, असे नियोजन जिल्हा संघाच्या वतीने करण्यात आले. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात नाशिक जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी राजीव म्हसकर यांच्याकडे शिष्टमंडळ गेले. सीएमपी प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन अदा करण्यासंदर्भात चर्चा केली. यामध्ये सीएमपी प्रणालीमध्ये वेतन अदा करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी घेणे अत्यावश्यक असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे याच आठवड्यात आम्ही त्यासंदर्भाने राज्य शासनाकडे पत्र पाठवून त्यांची अनुमती मागणार असल्याचे सांगितले. त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, जिल्हाध्यक्ष अर्जुन ताकाटे, सरचिटणीस धनराज वाणी, कार्याध्यक्ष विनायक ठोंबरे, कोषाध्यक्ष बाजीराव सोनवणे, राजेंद्र पाटील, प्रदीप पेखळे, ललित पगार, सुभाष भदाणे, विश्वास भवर, माणिक कुशारे व शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
---------------------
मुख्याध्यापक पदोन्नतीबाबत लवकरच निर्णय
मुख्याध्यापक पदोन्नती, केंद्रप्रमुख पदोन्नती, व विस्ताराधिकारी पदोन्नती कार्यवाही सुरू करण्यात आलेली असून, काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तालुकास्तरावरून आलेले निवडश्रेणीसंदर्भाने वर्षनिहाय याद्या गटनिहाय मागविण्यात आलेल्या आहेत. या महिन्यात संपूर्ण जिल्ह्याचा आराखडा घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन म्हसकर यांनी दिले. त्यानंतर नाशिक जिल्ह्याचे जिल्हा परिषद बाळासाहेब क्षीरसागर यांच्याशी विविध प्रश्नांच्या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. वित्त विभागात जाऊन वित्त प्रश्नासंदर्भात चर्चा केली. जिल्ह्यासाठी पगारासाठी असणारी रक्कम अद्याप आलेली नसून रक्कम आल्यानंतर तत्काळ पगार करण्याचे आश्वासन वित्त विभागामार्फत देण्यात आले.
--------------------
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांना निवेदन देताना शिक्षक संघाचे अंबादास वाजे, अर्जुन ताकाटे, धनराज वाणी, विनायक ठोंबरे, बाजीराव सोनवणे, राजेंद्र पाटील आदी. (१० पेठ १)
100821\10nsk_8_10082021_13.jpg
१० पेठ १