सुरू झाल्या शाळा; फुलला आनंदाचा मळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:11 AM2021-07-16T04:11:46+5:302021-07-16T04:11:46+5:30

------------------------------------- पाडळीत सुरू झाली शाळा सिन्नर : पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयासह तालुक्यातील अनेक शाळा गुरुवारी (दि.१५) सुरू झाल्या आहेत. ...

Schools started; Flower of joy! | सुरू झाल्या शाळा; फुलला आनंदाचा मळा!

सुरू झाल्या शाळा; फुलला आनंदाचा मळा!

Next

-------------------------------------

पाडळीत सुरू झाली शाळा

सिन्नर : पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयासह तालुक्यातील अनेक शाळा गुरुवारी (दि.१५) सुरू झाल्या आहेत. शासनाच्या व शिक्षण विभागाच्या दुटप्पी धोरणामुळे पालक व शिक्षक अस्वस्थ झाले होते. मुलांचे शैक्षणिक भवितव्य समोर ठेवत ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांनी पुढाकार घेत स्वतःच्या जबाबदारीवर इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली.

पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात पालक, ग्रामपंचायत पाडळी, आशापूर, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन पाल्याची जबाबदारी घेत प्रत्यक्षात मुलांना शाळेत आणून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. याला बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष गोविंद लोखंडे, सचिव प्रा. टी. एस ढोली, विश्वस्त अरुण भाऊ गरगटे यांनी संमती दिली.

१५ जूनला शाळा सुरू झाल्यानंतर सर्व शिक्षक विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती कमी असल्याने वाड्या-वस्त्यांवर जाऊन ज्ञानदानाचे काम करत होते. शासनाने ४५ दिवसांचा सेतू अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सांगितला आहे. तो पूर्ण करून घेण्यासाठी आजही शिक्षक वाड्या-वस्त्यांवरती जाऊन अध्यापनाचे काम करत आहेत. पण आता पालकांनीच पुढाकार घेऊन इयत्ता आठवी ते इयत्ता दहावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख सर यांनी पुढाकार घेऊन सर्व पालकांची संमती घेऊन शाळा सुरू केली. यासाठी पाडळी गावचे सरपंच सौ. सुरेखा रेवगडे, सुधीर पुंजा रेवगडे, आशापूरचे सरपंच विष्णुपंत पाटोळे यांनी ग्रामपंचायतीचा ठराव दिला असून यासाठी चंद्रभान रेवगडे, धनंजय रेवगडे, नाना रामभाऊ पाटोळे, रघुनाथ पाटोळे, अशोक रेवगडे, तुकाराम रेवगडे, प्रल्हाद रेवगडे यांनी सहकार्य केले.

कोट.....

नाशिक जिल्ह्यातील एकूण ३०० शाळांनी १५ जुलैला शाळा सुरू करण्याबाबत संमती दिली असतानाही शिक्षण विभागाने ठोस निर्णय न घेता शाळा सुरू करण्याबाबत संदिग्ध वातावरण निर्माण केले. त्यामुळे शाळा सुरू करावी की करू नये याबाबत मुख्याध्यापकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली. मुख्याध्यापक, शिक्षक, पालक विद्यार्थी शाळा उघडण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे शासन व शिक्षण विभागाने ठोस निर्णय घेवून कोविड-१९च्या प्रतिबंधक उपायांची सर्व वैद्यकीय सुविधा पुरवून शाळांना आदेश द्यावेत व विद्यार्थ्यांचे लसीकरण त्वरित करून घ्यावे.

- एस.बी. देशमुख, सचिव, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ

----------------

बारागांव पिंप्रीत शाळा गजबजली

बारागाव पिंप्री येथील गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रत्यक्ष अध्यापनास सुरुवात झाली. कोरोनाचे कमी होणारे प्रमाण बघता शासनाने कोविडमुक्त गावात कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते. येथील ग्रामपंचायत स्कूल कमिटी यांच्या एकत्रित बैठकीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवार (दि.१५) पासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. बऱ्याच प्रतीक्षेनंतर शालेय परिसर विद्यार्थ्यांच्या आगमनाने गजबजून गेला. विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळा सुरू करण्यासाठी शाळा निर्जंतुकीकरण करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य अशोक बागुल, पर्यवेक्षक दसरथ जारस, ज्युनियर कॉलेज इन्चार्ज भाऊराव गुंजाळ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तयारीसाठी परिश्रम घेतले.

----------------------------

ठाणगावला विद्यार्थ्यांत उत्साह

ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर व डॉ. आण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात आठवी ते बारावीचे वर्ग पालकांच्या सहमतीने सुरू करण्यात आले. स्थानिक स्कूल कमिटीची बैठक होऊन शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत शाळा सुरू करण्यात आली. गावात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून सर्वानुमते शाळा सुरू करण्यात आली असून विविध नियमांचे पालन विद्यार्थी करत असल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले. शाळेच्या वतीने प्रवेशद्वारावर प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान व ऑक्सिजन मोजण्यात येत आहे. शाळेत एक दिवस मुले व एक दिवस मुली, एका बाकावर एकच विद्यार्थी बसणार असून बाकामधील अंतर हे सहा फुटांचे ठेवण्यात आले आहे. दीड वर्षानंतर शाळा भरत असल्याने आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता.

कोट.......

एक ते सव्वा वर्षानंतर आज शाळा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना मनस्वी आनंद झाला आहे. आतापर्यंत ऑनलाइन शिक्षण चालू होते. परंतु आमची शाळा ही ग्रामीण भागात असल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळे निर्माण होत होतेे. त्यामुळे सर्वच संभ्रमात होते. सर्वच विषय काही ऑनलाइन शिकवले जाऊ शकत नाहीत. गणित विषयाचे व फळ्याचे एक अतूट नाते आहे. शाळा ही विद्यार्थी व शिक्षक यातील दुवा आहे. तो आज जाेडला गेल्याचा आनंद आहे.

- प्रतीक्षा थोरात, शिक्षिका, भोर विद्यालय, ठाणगाव

-----------------------------

काेट....

शाळा सुरू झाली याचा आम्हाला खूप आनंद झाला. सर्व मित्रमैत्रिणी, आमचे शिक्षक सर्व एकत्र बघून शाळेच्या सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आता रोज आमच्या हाती पुस्तक, वही, पेन असेल. त्यामुळे आमचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही.

- गौरव जयराम गायकवाड, विद्यार्थी, हरणगाव

कोट....

गेल्या वर्षभरानंतर शाळा सुरू झाली. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात आनंदाचे वातावरण झाले, पेठसारख्या अतिदुर्गम भागात, बऱ्याच ठिकाणी मोबाइल नेटवर्क नसल्याने प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण देणे मोठ्या जिकिरीचे काम होते. आज विद्यार्थी आणि शिक्षक पुन्हा एकदा एकत्र आल्याने शिक्षणाचा आणि अध्यापनाचा अनुभव घेत आहोत.

- धनंजय चव्हाण, मुख्याध्यापक, हरणगाव

फोटो - १५ सिन्नर पाडळी स्कूल

सिन्नर तालुक्यातील पाडळी येथे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची थर्मामीटरने तपासणी करताना शिक्षक.

फोटो- १५ सिन्नर बारागाव पिंप्री स्कूल

बारागाव पिंप्री येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थ्यांनी फुलून गेलेले प्रांगण.

फोटो- १५ चिखलओहोळ स्कूल

चिखळओहोळ येथील कर्म. ना.स. देशमुख विद्यालयात सुरू झालेले वर्ग.

150721\15nsk_24_15072021_13.jpg~150721\15nsk_25_15072021_13.jpg~150721\15nsk_26_15072021_13.jpg

 फोटो - १५ सिन्नर पाडळी स्कूल सिन्नर तालुक्यातील पाडळी येथे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची थर्मामिटर ने तपासणी करतांना शिक्षक.~फोटो- १५ सिन्नर बारागाव पिंप्री स्कूल बारागाव पिंप्री येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थ्यांनी फुलून गेलेले प्रांगण. ~फोटो- १५ चिखलओहोळ स्कूल चिखळओहोळ येथील कर्म.ना.स.देशमुख विद्यालयात सुरू झालेले वर्ग. 

Web Title: Schools started; Flower of joy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.