नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:31 AM2018-05-31T00:31:57+5:302018-05-31T00:31:57+5:30
नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९५.९० टक्के इतका लागला. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ९०.५६ टक्के इतका लागला.
नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९५.९० टक्के इतका लागला. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ९०.५६ टक्के इतका लागला. कला शाखेचा निकाल ७५.२५ टक्के इतका लागला, तर किमान कौशल्य विभागाचा निकाल ७७.२८ टक्के लागला. विभागातून विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ६५,१७५ इतके आहे. वाणिज्य शाखेतून १९,४४८, तर कला शाखेतून ४८,८०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. किमान कौशल्य अभ्यासक्रमातून ४६२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही विज्ञान शाखेचा निकाल अधिक लागल्याने यंदा अभियंता शाखेकडे प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. असे असले तरी वाणिज्य शाखांमध्ये निर्माण झालेल्या संधी पाहता वाणिज्य शाखेतील अनेक शाखांकडेदेखील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वळणार असल्याचे एकूणच चित्र आहे.
पुरवणी परीक्षा जुलै-आॅगस्टमध्ये
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये याकरिता जुलै-आॅगस्ट २०१५ मध्ये प्रथमच इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा सप्टेंबर-आॅक्टोबरऐवजी जुलै-आॅगस्टमध्ये घेण्याबाबत मान्यता दिलेली आहे. इयत्ता बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना जुलै-आॅगस्टमध्ये पुरवणी परीक्षा देता येणार आहे.
यंदा कॉपीचे सर्वाधिक प्रकार
यावर्षी बारावी परीक्षेत अनपेक्षितपणे कॉपीचे प्रकार आढळून आले आहेत. यावर्षी विभागात २२४ इतके कॉपीप्रकार आढळून आले. यामध्ये सर्वाधिक १०९ प्रकरणे ही जळगाव जिल्ह्यातच आढळून आली आहेत, तर त्या खालोखाल धुळ्यामध्ये ५३ कॉपीची प्रकरणे आढळून आली. नाशिकमध्ये ३६ कॉपी केसेस समोर आल्या होत्या, तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी आठ कॉपी प्रकरणे आढळून आली होती.