तारांगणजवळ सायन्स सेंटर उभारणार
By admin | Published: September 9, 2016 01:13 AM2016-09-09T01:13:53+5:302016-09-09T01:14:04+5:30
समितीची बैठक : विज्ञानविषयक उपक्रमांचे आयोजन
नाशिक : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्पाच्या मोकळ्या जागेत सायन्स सेंटर उभारण्याचा निर्णय महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर तारांगण प्रकल्पात विज्ञानविषयक विविध उपक्रमांचेही आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.
तारांगण प्रकल्पासंबंधी महासभेने समितीची स्थापना केली होती. या समितीची पहिली बैठक महापौरांच्या दालनात झाली. यावेळी तारांगणच्या मोकळ्या जागेत सायन्स सेंटर उभारण्याचे ठरविण्यात आले. स्व. आमदार उत्तमराव ढिकले यांनी नाट्यगृहासाठी महापालिकेला सुमारे २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु एवढ्या रकमेत नाट्यगृह उभारणे शक्य नसल्याने सदरचा निधी सायन्स सेंटरची इमारत उभारण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यासाठी सदरचा निधी वर्ग करण्याकरिता विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव देण्याचे ठरविण्यात आले.
या सायन्स सेंटरमध्ये विज्ञानविषयक प्रकल्पांबरोबरच मुलांना आकर्षित करणारे विज्ञानविषयक खेळही असणार आहेत. तसेच टेरेसवर टेलिस्कोपही बसविण्यात येणार आहे. दरम्यान, तारांगण प्रकल्प अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. दि. ४ ते १० आॅक्टोबरला जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जाणार असून, त्यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. तारांगणचे आधुनिकीकरण करणे, विज्ञानविषयक वाचनालय चालविणे आदिंबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
बैठकीला उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती सलीम शेख, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, पश्चिम प्रभाग सभापती शिवाजी गांगुर्डे, पूर्व विभाग सभापती नीलिमा आमले, सातपूर प्रभाग सभापती सविता काळे, माकपा गटनेते तानाजी जायभावे, शहर अभियंता सुनील खुने, सल्लागार समितीचे सदस्य अपूर्वा जाखडी, ओमप्रकाश कुलकर्णी, अविनाश शिरोडे, जयदीप शाह आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)