मनपातर्फे २५ पासून सायन्स फेस्टिव्हल
By admin | Published: June 22, 2016 11:29 PM2016-06-22T23:29:51+5:302016-06-23T00:05:18+5:30
मनपातर्फे २५ पासून सायन्स फेस्टिव्हल
नाशिक : महापालिका आणि संडे सायन्स स्कूल यांच्या वतीने ‘सायन्स फेस्टिव्हल- २०१६’ या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दि. २५ व २६ जून या कालावधीत यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटर येथे करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी दिली आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संडे सायन्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले विविध वैज्ञानिक मॉडेल्स, प्रकल्प प्रदर्शित केले जाणार असून, गेम डिझायनर मानस गाजरे हे विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल रिअॅलिटी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मेकर्स अड्डातर्फे परीक्षित जाधव आणि नीलय कुलकर्णी ‘स्क्रॅच प्रोग्रामिंग’ या विषयावर कार्यशाळा घेणार आहेत. या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांनी स्वत: लॅपटॉप घेऊन यावा. अंनिसचे महेंद्र दातरंगे हे प्रात्यक्षिके दाखविणार आहेत, तर कल्पना युथ फाउंडेशनतर्फे ‘अंतराळशास्त्र’ या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.