मननशक्तीमुळेच विज्ञानाची घोडदौड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:24 AM2017-11-07T00:24:59+5:302017-11-07T00:25:09+5:30
मनन-चिंतनाची शक्ती माणसाला मिळाली म्हणून तो ‘माणूस’ आहे. मनन करणे हा शरीर किंवा इंद्रियांचा धर्म नाही तर तो बुद्धी अथवा मनाचा धर्म आहे. चिंतन, विवेक, विचार करण्याची व अंतर्मुख होऊ न जीवनाचे निरीक्षण करण्याची शक्ती माणसाकडे आहे. या शक्तीमुळचे विज्ञान आज प्रगल्भ झाले आहे. माणसाच्या वैचारिक अशा अंतरंगातील मननशक्तीमुळे विज्ञानाची घोडदौड सुरू असल्याचे प्रतिपादन श्रुतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.
नाशिक : मनन-चिंतनाची शक्ती माणसाला मिळाली म्हणून तो ‘माणूस’ आहे. मनन करणे हा शरीर किंवा इंद्रियांचा धर्म नाही तर तो बुद्धी अथवा मनाचा धर्म आहे. चिंतन, विवेक, विचार करण्याची व अंतर्मुख होऊ न जीवनाचे निरीक्षण करण्याची शक्ती माणसाकडे आहे. या शक्तीमुळचे विज्ञान आज प्रगल्भ झाले आहे. माणसाच्या वैचारिक अशा अंतरंगातील मननशक्तीमुळे विज्ञानाची घोडदौड सुरू असल्याचे प्रतिपादन श्रुतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वरूपानंद सरस्वती यांनी केले. गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात शिवशक्ती ज्ञानपीठाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेला सोमवारी (दि. ६) प्रारंभ करण्यात आला. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सरस्वती यांनी ‘मनोनिग्रह’ विषयावर गुंफले. यावेळी ते म्हणाले, माणूस ज्या विवेकशक्तीमुळे माणूस आहे, ती विवेकशक्ती त्याला मिळालेली दुर्लभ अशी देणगी आहे. यामुळेच तो ‘माणूस’ म्हणून ओळखला जातो. बहिरंगाने माणूस म्हणून जगणे म्हणजे जीवन नव्हे, तर माणसातला ‘माणूस’ असल्याची जाणीव ठेवून जगणे म्हणजे माणसाचे जगणे होय. एक माणूस म्हणून जेव्हा व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक जीवन तो जगतो तेव्हा खरोखर बहिरंगाच्या विकासाने त्याचे जीवन विकसित झालेले आहे का या प्रश्नाचे उत्तर मिळते. बहिरंगाने समृद्ध, विद्वत्ता मिळविल्यामुळे किंवा प्रजोत्पत्ती केली म्हणून तो माणूस झाला असे नाही, तर माणसाच्या मनाच्या वैचारिक शक्तीमुळे तो माणूस म्हणून ओळखला जातो, असे स्वरूपानंद यावेळी म्हणाले.
व्यावहारिक ज्ञान, पांडित्य, विद्वत्ता, समृद्धी, प्रतिष्ठा, मान-सन्मान, ज्ञान आत्मसात केले म्हणजे माणसाचा विकास झाला असे आपण आजपर्यंत ऐकत आलो; मात्र हा विकास केवळ बहिरंगाने झालेला असतो. बहिरंगाने माणूस म्हणून जगणे म्हणजे जगणे मुळीच नाही. माणसातला ‘माणूस’ आज नष्ट होतोय, अशी खंत स्वरूपानंद यांनी यावेळी व्यक्त केली.