गडाख विद्यालयात विज्ञान कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:48 PM2020-02-12T22:48:14+5:302020-02-12T23:50:43+5:30
पंचाळे येथील सूर्यभान गडाख प्राथमिक, माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एल. जी. इलेक्ट्रॉनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने फिरती विज्ञान प्रयोगशाळा उपक्रमांतर्गत कार्यशाळा पार पडली.
सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथील सूर्यभान गडाख प्राथमिक, माध्यमिक व उच्य माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एल. जी. इलेक्ट्रॉनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने फिरती विज्ञान प्रयोगशाळा उपक्रमांतर्गत कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेत नायट्रोजन लिक्विडमुळे पदार्थांत होणारे विविध बदल प्रयोगांच्या साह्याने दाखविण्यात आले. सौर चूल, पवनचक्की यांसारखे प्रयोग दाखवून जीवनात उपयुक्त असणारे विज्ञान मुलांना समजावून सांगण्यात आले. चार तासांच्या या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेत समन्वयक डॉ. संजय ढोले, नंदराज कोळेकर, सीताराम बहीर, किरण तुरूकमोरे, गणेश सोनवणे, निशांत जगताप, प्रकाश वसावे, साईकिरण पद्मगिरीवर, आकाश गायगवळी, प्रफुल्ल म्हेस्कर, सोमनाथ मुर्तडक या टीमने विद्यार्थ्यांना प्रयोगात सहभागी करून घेतले. मनोरंजन, नाटिका, प्रयोग यातून विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती वाढीस लागावी हा या कार्यशाळे- मागील हेतू असल्याचे सांगितले. केळी दगडाप्रमाणे कडक करणे, रबरी बॉल खापराप्रमाणे ठिसूळ बनविणे, हिरवी पाने-फुले काही सेकंदात वाळवणे, यात कुठलाही चमत्कार नसून विज्ञानाची किमया असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखविले.