आदिवासी रॅँचोंचा वैज्ञानिक आविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 05:07 PM2019-02-06T17:07:58+5:302019-02-06T17:08:13+5:30
पेठ तंत्रनिकेतन : पायडल शिवाय चालवा सायकल
पेठ : तालुक्यातील दुर्गम भागात दऱ्याखो-यात राहणा-या व येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तंत्रनिकेतनचे प्रशिक्षण घेणा-या आदिवासी रँचोंनी संशोधन करीत बॅटरीवर चालणारी सायकल, चोरापासून घराची सुरक्षा करणारी आधुनिक यंत्रणा, स्मार्ट हेल्मेटसह मद्यप्राशन केले असल्यास दुचाकी सुरुच होणार नसल्याचा वैज्ञानिक आविष्कार दाखविला असून नुकत्याच झालेल्या तंत्रनिकेतनच्या प्रदर्शनात त्याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.
एरवी सायकल चालवतांना स्वाराला चांगलीच कसरत करावी लागते. पायडल मारल्याशिवाय सायकल पुढे सरकने शक्य नाही. यावर संशोधन करीत विद्यार्थी विठोबा खैरणार, रूपाली खंबाईत, तानाजी बागूल, नुतन हाडस, रविंद्र राऊतमाळे व मार्गदर्शक शिक्षक राजेंद्र मेतकर यांनी जुन्या सायकलला केवळ ५ हजार रूपयाचा खर्च करून नव्या युगाची बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली आहे. विशेष म्हणजे जवळपास शंभर किलोचे ओझे घेऊन ही सायकल खडतर रस्त्यावरही विनासायास चालवू शकतो. या सायकलीची नुकतीच अधिकारी व शिक्षकांसमवेत यशस्वी चाचणी घेण्यात आली. यामुळे इंधनाबरोबर पर्यावरणाचे रक्षण होणार असल्याचे नव संशोधकांनी सांगितले. याच संस्थेतील विद्यार्थी मयुरी भोये, मनिषा गांगोडे, अजय गवळी, महेंद्र सातपुते आदींनी शिक्षक संभाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट हेल्मेटची निर्मिती केली आहे. यामध्ये डोक्यात हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालूच होणार नाही, मद्य प्राशन करून दुचाकी चालवण्याचा प्रयत्न केल्यास ती लगेचच बंद पडेल. अशा प्रकारच्या सुविधा करण्यात आल्या आहेत. या स्मार्ट हेल्मेटमुळे रस्त्यावर होणा-या अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल, असा विश्वास शिक्षक व मुलांनी व्यक्त केला आहे. याच बरोबर चोरांपासून घराची सुरक्षा करणारी यंत्रणा, मोबाईल चार्जिंग रोबोट, ई -सायकल आदी प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या.
५२ प्रतिकृती सादर
पेठ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तंत्र प्रदर्शन 2019 भरवण्यात आले. यामध्ये नव संशोधकांनी जवळपास ५२ प्रतिकृती सादर केल्या. महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांचे हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षण अधिकारी एस.डी. नलावडे, प्राचार्य एम.एस. चकोर उपस्थित होते. प्राचार्य एस. सी. राठोड यांनी प्रास्ताविक केले. या प्रदर्शनाचा तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.