तीन महिन्यांनंतर चालली कात्री...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:24 AM2020-06-29T00:24:41+5:302020-06-29T00:26:48+5:30
तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर सलून सुरू करण्याला परवानगी मिळाली आणि रविवारी (दि.२८) सलूनमध्ये कटिंग सुरू झाली. तूर्तास दाढी करण्याला मनाई करण्यात आलेली असल्याने फक्त कटिंग करण्यात येत आहे.
नाशिक : तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर सलून सुरू करण्याला परवानगी मिळाली आणि रविवारी (दि.२८) सलूनमध्ये कटिंग सुरू झाली. तूर्तास दाढी करण्याला मनाई करण्यात आलेली असल्याने फक्त कटिंग करण्यात येत आहे. रविवारी पहिल्या दिवशी शहरात ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोरोनाचे सावट असल्याने सलून व्यावसायिकांकडून मात्र सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचे दिसून आले.
कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नसताना पोटापाण्यासाठी सलून व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागला. राज्य शासनाने सलून सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर शहरातील सलून व्यावसायिकांनी दुकाने उघडली. तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दुकाने सुरू झाली असली तरी तत्पूर्वी दुकानदारांना चांगलीच पूर्वतयारी करावी लागली.
दाढी करण्याला परवानगी देण्यात आली नसल्याने मात्र नाराजीदेखील अनेक व्यावसायिकांनी बोलून दाखविली. कारोनाचा धोका लक्षात घेऊन काम करताना घालण्यात आलेल्या निर्बंधावरील नाराजी अनेकांची उघड केली. दरम्यान, गेल्या अडीच-तीन महिन्यांत झालेल्या नुकसानीच्या भरपाईची मागणीदेखील अनेकांनी केली.