पोलीस ठाण्यांत ‘भंगार’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:54 PM2017-11-06T23:54:34+5:302017-11-07T00:21:22+5:30
गुन्हेगारी घटनांमधील, चोरीची, अपघातांमधील, बेवारस, आरटीओ कारवाई यातील वाहनांची निर्धारित वेळेत विल्हेवाट लावणे शक्य होत नाही़ त्यामुळे ही वाहने वर्षानुवर्षे पोलीस ठाण्यांच्या आवारात पडून राहतात़ सद्यस्थितीत शहरातील सर्व पोलीस ठाणे आवारांतील वाहनांची संख्या हजारोंच्या घरात असून, यामुळे पोलीस ठाण्यांना भंगार गुदामाचे स्वरूप आले आहे़
विजय मोरे।
नाशिक : गुन्हेगारी घटनांमधील, चोरीची, अपघातांमधील, बेवारस, आरटीओ कारवाई यातील वाहनांची निर्धारित वेळेत विल्हेवाट लावणे शक्य होत नाही़ त्यामुळे ही वाहने वर्षानुवर्षे पोलीस ठाण्यांच्या आवारात पडून राहतात़ सद्यस्थितीत शहरातील सर्व पोलीस ठाणे आवारांतील वाहनांची संख्या हजारोंच्या घरात असून, यामुळे पोलीस ठाण्यांना भंगार गुदामाचे स्वरूप आले आहे़ त्यामुळे या वाहनांचे करायचे तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ न्यायालयाच्या निर्णयानंतर काही वाहने संबंधित मालकाच्या ताब्यात दिली जातात परंतु ही प्रक्रिया प्रचंड वेळकाढूपणाची असते़ गतवर्षी पोलीस आयुक्तालय स्तरावर अशा वाहनांबाबत विशेष परवानगी घेऊन त्यांचा लिलाव करण्यात आला मात्र अजूनही न्यायालयीन प्रकियेतील तसेच बेवारस वाहने पोलीस ठाणे आवारात असून, त्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.
वाहने लावायची कोठे?
पोलीस ठाण्यातील जागा कमी पडत असून, दिवसेंदिवस वाढणारी ही वाहने लावायची कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ या वाहनांसाठी स्वतंत्र जागा नसल्याने नाईलाजाने ती पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवावी लागतात़ विशेषत: महामार्गावरील पोलीस ठाण्यांमध्येही या वाहनांची संख्या अधिक आहे़ याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महामार्गावरील अपघात आहे़ तसेच चोरटे चोरीसाठी वाहनांची चोरी करतात व काम झाल्यानंतर ती रस्त्याच्या कडेला टाकून पसार होतात़
वाहनांच्या पार्टस्ची चोरी
नाशिक शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या आवारात विविध गुन्ह्यांत जप्त केलेली वाहने लावलेली आहेत़ या वाहनांमध्ये दुचाकी, रिक्षा, चारचाकी, ट्रक व टेम्पोचाही समावेश आहे. शहरातील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांच्या आवारातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ पंचवटी पोलीस ठाण्याच्या बाहेरील फुटपाथवरही अनेक दिवसांपासून अपघातग्रस्त वाहने उभी आहेत़ विशेष म्हणजे या गाड्यांचे काही महत्त्वाचे पार्टस् चोरट्यांनी चोरून नेले आहे़
दिवसाला दोन वाहनांची चोरी
नाशिक शहराची लोकसंख्या सुमारे वीस लाखांच्या आसपास आहेत़ लोकसंख्येबरोबरच शहरातील वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे़ त्यातच वाहन हे गरजेचे साधन बनल्याने कंपन्यांच्या नवीन वाहनांबरोबरच वाहनचोरीचेही प्रमाण चांगलेच वाढले आहे़ सोसायट्यांचे वाहनतळ, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणाहून वाहने चोरीस जाण्याची संख्या जास्त आहे़ गत काही वर्षभरातील वाहनचोरीचा आढावा घेतल्यास कोट्यवधी रुपयांची वाहने चोरांनी चोरून नेल्याचे दिसून येते़ विशेष म्हणजे रिक्षा, कार, ट्रक व महागड्या कारचीही चोरी होऊ लागली आहे़
चोरीस गेलेली (कंसात सापडलेली) वाहने़
२०११ - १०७९ (२०२)
२०१२ - ६१५ (१४०)
२०१३ - ४८९ (११९)
२०१४ - ६८५ (१४१)
२०१५ - ६३४ (१००)
२०१६ - ५२८ (१०९)
२०१७ - ५०३ (९०) नोव्हेंबरपर्यंत
एकूण : ४५३३ (९०१)
विविध गुन्हे, अपघात, बेवारस अशा गाड्या तपास पूर्ण होईपर्यंत वा न्यायालयीन प्रक्रिया सुरू असेपर्यंत संबंधित पोलीस ठाण्यांच्या आवारात ठेवणे आवश्यक असते़ या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने आपल्या पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या वाहनांची संख्या आयुक्तालयास कळविली होती़ त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर ४९२ वाहनांचा लिलाव प्रक्रियाही राबविण्यात आली होती. सध्या नाशिकरोड पोलीस ठाण्यात बेवारस वाहनांचे प्रदर्शन सुरू आहे. तसेच पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांबाबत प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कायदेशीर प्रकरणातील वाहनांबाबत न्यायालयाच्या आदेशाशिवाय पोलिसांना निर्णय घेता येत नाही़ - सचिन गोरे, सहायक पोलीस आयुक्त, नाशिक