हलकल्लोळ...अश्रुंचे लोट...अन् संतापाचा आगडोंब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:14 AM2021-04-22T04:14:46+5:302021-04-22T04:14:46+5:30
नाशिक : ओ डॉक्टर, ओ डॉक्टर... ओ सिस्टर, ओ सिस्टर... ओ दादा... ओ कुणीतरी बघा हो आमच्या पेशंटला दादा... ...
नाशिक : ओ डॉक्टर, ओ डॉक्टर... ओ सिस्टर, ओ सिस्टर... ओ दादा... ओ कुणीतरी बघा हो आमच्या पेशंटला दादा... ओ सिस्टर आमच्या पेशंटला वाचवा हो... कुणी पेशंटच्या छातीवर पंपिंग करतंय, कुणी हातपाय चोळतंय, कुणी ऑक्सिजन सिलेंडर कुठे मिळतंय का म्हणून धावतंय तर कुणाच्या रुग्णाने श्वासच थांबवल्याने उर बडवून घेतोय. इतके विदारक आणि जीवाचा थरकाप उडवणारे दृश्य दुपारी साडेबारा ते दीडदरम्यान झाकीर हुसेन रुग्णालयात होते. सर्वत्र हलकल्लोळ, रडारड, आणि संतापाचा आगडोंब उफाळून येत होता.
झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानकपणे ऑक्सिजन टँकची गळती होण्यास प्रारंभ होताच जे रुग्ण व्हेंटिलेटरवर होते, त्यांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होणे कमी झाले, तर जे ऑक्सिजनवर होते त्यांचा ऑक्सिजन पुरवठादेखील कमी झाल्याने सर्वत्र अंदाधुंद परिस्थिती निर्माण झाली होती. तब्बल १५ रुग्ण जे व्हेंटिलेटरवर होते, त्या रुग्णांची अवस्था बिकट होती. तसेच ऑक्सिजनवर असलेल्या १३१ पैकी सुमारे निम्मे रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याने त्यांनादेखील नितांत आवश्यकता होती. अशा वेळी अचानकपणे उद्भवलेल्या या पेचप्रसंगामुळे रुग्णालयातील सर्व रुग्णांकडून अचानकपणे पुकारा होऊ लागला. डॉक्टर्स, वॉर्डबॉय आणि नर्सेसची प्रचंड धावपळ उडाली. ऑक्सिजन पुरेशा प्रेशरने मिळावे, यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागले. अत्यावस्थ रुग्णाजवळ थांबून पंपिंग करण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच उरले नव्हते. अशावेळी ज्या रुग्णांचे नातेवाईक हॉस्पिटलच्या परिसरातच थांबले होते, त्यांनी तातडीने आतमध्ये धाव घेत आपापल्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु केली. कुणी डॉक्टरांच्या नावाने हाक मारतोय, कुणी एखाद्या वॉर्डबॉयचा हात धरुन त्याला आपल्या पेशंटजवळ येण्याची विनंती करतो, कुणी सिस्टरसमोर रडतोय, ओरडतोय सर्वत्र गोंधळ माजल्याचे हृयद्रावक चित्र हॉस्पिटलमध्ये दुपारी साडेबारापासून सुमारे दोन तासांहून अधिक काळ सुरु होते.
इन्फो
काळजाचा थरकाप उडवणारा टाहो
साडेबारा वाजेपासून तब्बल दीड तास रुग्णालय आणि रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा टाहो उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडवणारा होता. कुणाचे अश्रू थांबत नव्हते, तर कुणी रडून, रडून अस्वस्थ झाल्याने बसल्या जागीच कोसळत होते. कुणाचे आप्त आक्रोश करणाऱ्या जिवलगाला जवळ घेऊन त्यांचा आक्रोश शांत करीत, समजूत घालत होते. काही संतप्त नातेवाईक तर नंतर ऑक्सिजन सिलेंडर आणणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावरदेखील धावून जात होते. एकेका मृताच्या कुटुंबीयांच्या टाहोने संपूर्ण रुग्णालय दणाणून गेले होते.