म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदाच्या वादावर पडदा

By admin | Published: July 9, 2017 01:12 AM2017-07-09T01:12:01+5:302017-07-09T01:12:13+5:30

नाशिक : म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या अध्यक्षपदाच्या वादावर अखेर पडदा पडला आहे.

Screen dispute over the issue of municipal employee's presidency | म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदाच्या वादावर पडदा

म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदाच्या वादावर पडदा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या अध्यक्षपदाच्या वादावर अखेर पडदा पडला असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री बबन घोलप यांनी सुरुवातीपासून तिदमे यांच्या नावाचा आग्रह धरल्याने त्यांची सरशी झाली आहे.
म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेचे अध्यक्ष शिवाजी सहाणे यांना हटवून त्यांच्या जागेवर नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष बबन घोलप यांनी दीड-दोन महिन्यांपूर्वी दिले होते. घोलप यांनी कार्यकारिणी मंडळाला विश्वासात न घेता परस्पर अध्यक्षाची नियुक्ती केल्याने वादाला तोंड फुटले होते. त्यातच शिवाजी सहाणे यांनीही परस्पर झालेल्या नियुक्ती प्रक्रियेला आक्षेप घेत आपणच अध्यक्षपदी असल्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे वाद चिघळला होता. दरम्यान, बबन घोलप यांनी सदर नियुक्तीचा प्रश्न प्रतिष्ठेचा केला आणि एक दिवस स्वत: महापालिकेत येऊन कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीचा ताबा घेतला. मध्यंतरी महानगरप्रमुख अजय बोरस्ते व गटनेता विलास शिंदे यांनी मध्यस्थीचेही प्रयत्न करून पाहिले होते. परंतु, प्रयत्न विफल ठरले होते. त्यानंतर सहाणे यांनी कार्यकारिणी मंडळाची बैठक घेत राजीनामा सुपूर्द केला व पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो मान्य करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पक्षप्रमुखांच्या निर्णयाकडे लक्ष लागून होते. अखेर, शुक्रवारी बबन घोलप यांनी तिदमे यांना घेऊन मातोश्री गाठले व उद्धव ठाकरे यांच्यापुढे वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर मध्यवर्ती कार्यालयातून तिदमे यांची अध्यक्षपदी नियुक्त केल्याचे पत्रक निघाले. तिदमे यांच्या नियुक्तीमुळे अखेर अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे.

Web Title: Screen dispute over the issue of municipal employee's presidency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.