कालिदासमधील महासभेच्या नाटकावर पडदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 07:08 PM2020-05-18T19:08:34+5:302020-05-18T19:10:44+5:30
नाशिक : सध्या कोरोनाच्या संकटामुळे महासभा घ्यावी किंवा नाही याबाबत खल सुरू असतानाच अखेर महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयुक्तांशी ...
नाशिक : सध्या कोरोनाच्या संकटामुळे महासभा घ्यावी किंवा नाही याबाबत खल सुरू असतानाच अखेर महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर बुधवारी (दि.२०) होणारी महासभा रद्द करण्याचा निर्णय घेतला
आहे. अर्थात महासभा रद्द झाली असली तरी स्थायी समितीची बैठक मात्र मंगळवारी (दि.१९) महासभेच्या ठिकाणी भव्य सभागृहात सभा घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे विविध विषयांबरोबरच गोदावरी नदीवरील ३२ कोटी
रुपयांच्या पुलांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव पटलावर असल्याने ही बैठक होत असल्याची चर्चा आहे.
लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे सध्या कोरोना वगळता सर्व शासकीय, निमशासकीय संस्थांच्या बैठका बंद आहेत. अशातच महापौर सतीश कुलकर्णी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी थेट महाकवी कालिदास सभागृहात महासभा घेण्याचे नियोजन केल्याने त्यावर वादविवाद सुरू झाले होते. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांना निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी महासभा स्थगित केली आहे.
ती सभा घ्यावी किंवा नाही याबाबत निर्णय झाला नसतानाच स्थायी समितीने मात्र १९ मे रोजी बैठक बोलावली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी ही सभा समितीच्या सभागृहात न होता महासभेच्या सभागृहात होणार
आहे. त्यावर अनेक विषयांबरोबरच गोदावरी नदीवरील दोन पूल बांधण्याच्या ठेक्यांना मंजुरी देण्याचा विषय असल्याचे समजते. या पुलांवरून भाजपमध्ये अगोदरच अंतर्गत वाद आहेत. एका गटाने पुलांसाठी आग्रह धरला तर आमदार
देवयांनी फरांदे यांनी या पुलांमुळे गंगापूररोड भागात पुराचा धोका वाढण्याच्या शक्यतेने विरोध केला होता, त्यानंतरदेखील जलसंपदा विभागाचा ना हरकत दाखला घेऊन या पुलाला चालना देण्यात आली होती. त्यामुळे ऐन
कोरोनाच्या संकटात ही सभा बोलावण्यात आणि पहिल्याच सभेत याच पुलांच्या मंजुरीचा विषय असल्याने उलटसुलट चर्चा भाजपमध्येच सुरू झाल्या आहेत.
कोट
नागरी कामे ठप्प झली असल्याने अनेक कामांना चालना देणे आवश्यक होते.
मुंबई पुण्यासह अन्य ठिकाणी महासभा आणि अन्य कामे सुरळीत सुरू आहेत.
त्यामुळे स्थायी समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. कोरोनाबाबतच्या
सुरक्षीतेचे नियम पाळूनही ही सभा होईल.
- गणेश गिते, सभापती, स्थायी समिती