लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्ष निरीक्षकांकडून चाचपणी
By धनंजय रिसोडकर | Published: August 25, 2023 08:01 PM2023-08-25T20:01:12+5:302023-08-25T20:01:25+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांपूर्वीच लाेकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता राजकीय क्षेत्रात चर्चिली जात असल्याने सर्वच पक्ष सध्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीवरच भर देत आहेत.
नाशिक : मनसेचे नाशिक जिल्ह्याचे पहिले पक्ष निरीक्षक ॲड. किशोर पाटील यांनी नाशिकचे राज्यस्तरीय पदाधिकारी, शहरातील पदाधिकाऱ्यांशी एकेकाशी चर्चा करून पक्षवाढीसाठी काय करता येईल, याबाबत पदाधिकाऱ्यांचे मनोगत जाणून घेतले. तसेच वर्षभरातील विधानसभा आणि लोकसभेच्या दृष्टीकोनातून चाचपणी केली.
नाशिकमध्ये मनसेला पुन्हा गतवैभवाचे दिवस आणण्यासाठी पक्षसंघटनेत वरिष्ठ स्तरावरून काही नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यात नाशिकसाठी किशोर पाटील यांची पक्षाचे सरचिटणीस किशाेर पाटील यांच्याकडे नाशिक जिल्हा निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दोन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नाशिकचे प्रमुख पदाधिकारी, शहर पदाधिकाऱ्यांशी त्यांनी वैयक्तिक संवाद साधला. नाशिक महापालिकेवर गत दशकात सत्ता राबविणाऱ्या मनसेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह कार्यकारिणीत झालेले बदल तसेच अंतर्गत कुरबुरींमुळे पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक चर्चा करून त्यांनी प्रत्येकाची जबाबदारी आणि त्यांच्या कामकाजाबाबतचा अहवाल जाणून घेतला.
स्थानिक स्वराज्य संस्थांपूर्वीच लाेकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता राजकीय क्षेत्रात चर्चिली जात असल्याने सर्वच पक्ष सध्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीवरच भर देत आहेत. त्यामुळेच मनसेनेदेखील पक्षाचा गत दशकातील बालेकिल्ला असलेल्या नाशिक लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही पाटील यांनी बैठकीत सांगितले. यावेळी व्यासपीठावर अशोक मुर्तडक, पराग शिंत्रे, अंकुश पवार, सुजाता डेरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.