मानूर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
By Admin | Published: May 31, 2017 12:36 AM2017-05-31T00:36:48+5:302017-05-31T00:37:11+5:30
दहशत : पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिळकोस : कळवण तालुक्यातील मानूर (पाडगण शिवार) परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, सोमवारी रात्री बिबट्याने कारभारी पुंडलिक पवार यांच्या मळ्यातील राहत्या घराजवळील गोठ्यातील म्हशीच्या पारडाचा फडशा पाडला असल्याने शिवारात वास्तव्यास असलेले शेतकरी, शेतमजूर हे बिबट्याच्या वास्तव्याने धास्तावले आहेत. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून सदर बिबट्या हा जेरबंद करावा, अशी मागणी मानूर येथील शेतकरी बांधवांकडून व पशुपालकांकडून होत आहे.
परिसरात बिबट्या येण्याचे प्रमाण दोन वर्षापासून वाढले असल्याने या कालावधीत मानूर परिसरातील शेतकरी, शेतमजूर व आदिवासी व मेंढपाळ बांधवांच्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. परिसरात पुन्हा बिबट्याने धुडगूस घालण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस शेतात जाताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. रात्रीच्या वेळेस परिसर बिबट्याच्या डरकाळ्यांनी दणाणत असून, शेतकरी, पशुपालक व शिवारातील वास्तव्यास असलेले ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. बिबट्याच्या उपद्रवामुळे मेंढपाळांनी मानूर परिसरातून स्थलांतरित होण्यास सुरवात केली आहे. शेळीपालन करणारे आदिवासी बांधवाना पशुधनाच्या सुरक्षतेसाठी रात्र जागून काढावी लागत आहे. परिसरातील बिबट्या जेरबंद करणे अत्यंत गरजेचे झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मानूर गावात बिबट्या येणे ही बाब आता नित्याची झाली आहे. आज शिवारातील शेतीची कामे करताना बिबट्याच्या या दहशतीमुळे शेतीची कामे पूर्णत: खोळंबली आहेत. गावातील मजूर कामास येण्यास धजावत नसून पशुपालनाचा व्यवसाय करणारे आदिवासी बांधवांचेही शेळ्या चरावयास शिवारात जाणे बंद
झाले आहे. बिबट्या परिसरात आल्यापासून गावकऱ्यांना व पशुपालकांना व मेंढपाळांना दहशतीत वावरावे लागते.