एकलहरे येथील रेशन दुकान सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 09:20 PM2020-04-22T21:20:21+5:302020-04-23T00:16:24+5:30
एकलहरे : लॉकडाउन काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने मुबलक धान्य उपलब्ध करून दिले असताना प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत ते पोहोचतच नसल्याचे उघड झाले आहे.
एकलहरे : लॉकडाउन काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने मुबलक धान्य उपलब्ध करून दिले असताना प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत ते पोहोचतच नसल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने दिलेले वृत्त आणि नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आमदार सरोज आहिरे यांनी दुकानदाराला जाब विचारला. तथापि, त्याने माहिती न देता टाळाटाळ केली आणि दुरुत्तरेही दिल्याने अखेरीस पुरवठा विभागाने दुकान सील केले.
नाशिक तालुका पूर्व भागातील काही रेशन दुकानदार रेशन नाकारून काळाबाजार करतात, अशा आशयाच्या तक्र ारी येत होत्या. ग्रामस्थ सरपंच मोहिनी जाधव यांच्याकडेही वारंवार तक्र ार करत होते. त्यानुसार तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वच रेशन दुकानदारांचा सर्व्हे करून १७ एप्रिल रोजी लोकमतमध्ये नागरिकांची व्यथा मांडली होती. सरपंच मोहिनी जाधव यांनी रेशन विभागाची आॅनलाइन लिंक प्रसारित करून रेशनबद्दल जनजागृती मोहीम राबवली होती. त्यामध्ये ग्रामस्थांना मंजूर असलेल्या व रेशन दुकानदार वाटप करत असलेल्या रेशन धान्यात खूप मोठी तफावत आढळून आली, त्यामुळे त्यांनी देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांच्याकडे तक्र ार केली. आमदार आहिरे यांनी स्वत: रेशन दुकानाला भेट देऊन दुकानचालकाकडे त्यांनी स्टॉक रजिस्टर मागितले असता ते देण्यास टाळाटाळ करून दुरु त्तरे दिली. आमदार आहिरे यांनी पुरवठा निरीक्षक एस. पी. थोरात यांच्याशी संपर्क साधून सदर प्रकरणात तत्काळ कारवाईचे आदेश दिले. पुरवठा निरीक्षक एस. पी. थोरात यांनी आय. बी. बियाणी यांच्या रेशन दुकान नंबर पाचची झाडाझडती घेतली असता तेथील कर्मचारी नियमबाह्य काम करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच ग्रामस्थांशी चर्चा केली असता प्रत्येक महिन्याला १० ते १५ किलो कमी रेशन मिळालेल्या व साखर तर वाटप न केलेल्या ग्रामस्थांचे जबाब घेतले व पुढील कार्यवाहीचे आदेश येईपर्यंत दुकानाला कुलूप लावण्यात आले.
याप्रसंगी राजाराम धनवटे, सागर जाधव, उपसरपंच अशोक पवळे, ग्रामविकास अधिकारी सुरेश वाघ, शानू निकम, भिकन मोरे, विठ्ठल पवार, किरण देशमुख आदी उपस्थित होते.