साहित्य संमेलनाच्या तारखांवर महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:07 AM2021-01-24T04:07:32+5:302021-01-24T04:07:32+5:30
नाशिक : नाशिकच्या भूमीत रंगणारे ९४ वे साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चदरम्यान घेणार असल्याचे महामंडळाच्या बैठकीत निश्चित झाले ...
नाशिक : नाशिकच्या भूमीत रंगणारे ९४ वे साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चदरम्यान घेणार असल्याचे महामंडळाच्या बैठकीत निश्चित झाले आहे. साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत या संमेलनाच्या तारखांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. त्याबाबतची अधिकृत घोषणा साहित्य महामंडळाकडून रविवारी करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाला कोणत्याही परिस्थितीत हे संमेलन यंदाच्या आर्थिक वर्षपूर्तीआधीच घ्यायचे होते. त्यानुसार साहित्य संमेलनाची तारीख मार्च महिन्यात अधिकाधिक अखेरच्या टप्प्यात ठेवण्याचे नियोजन महामंडळाने केले होते. त्याप्रमाणे शनिवारी झालेल्या अखिल भारतीय महामंडळाच्या बैठकीत शनिवारी संमेलनाच्या तारखांबाबत चर्चा झाली. त्यात सर्वानुमते २६ ते २८ मार्च या तीन दिवसांची निश्चिती करण्यात आली. शुक्रवार ते रविवार हे दिवस संमेलन आयोजनाच्या दृष्टीने आणि रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीच्या दृष्टीने नेहमीच सोयीस्कर ठरतात. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनासाठीही शुक्रवार (दि. २६ मार्च) ते रविवार (दि. २८ मार्च) या कालावधीतच संमेलन भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यादृष्टीने आतापासून करण्याच्या कामकाजाची आणि विशेष निमंत्रितांच्या निमंत्रणांसाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देशदेखील या बैठकीत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे आता लोकहितवादी मंडळाच्या धुरीणांसह सर्व पदाधिकाऱ्यांच्या हातात आता संमेलनाच्या तयारीसाठी केवळ दोन महिन्यांचाच कालावधी उरणार आहे.
इन्फो
रविवारी अधिकृत घोषणा
संमेलनाच्या अध्यक्ष निवडीसाठी झालेल्या या बैठकीत भारत सासणे, डॉ. जयंत नारळीकर आणि डॉ. जनार्दन वाघमारे या तीन नावांवर प्रदीर्घ काळ खल झाल्याचे समजते. मात्र, संमेलनाध्यक्ष पदाचे अधिकृत नाव आणि अधिकृत तारखांबाबत रविवारी (दि.२४) घोषणा करण्यात येणार आहे.
लोगो
साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.