चांदवडमधील प्रतिबंधित क्षेत्र सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 11:29 PM2020-06-14T23:29:45+5:302020-06-15T00:16:46+5:30
चांदवड शहरात पुन्हा एक ३८ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संबंधित परिसराला सील करण्यात आले असून या परिसरातील जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
चांदवड : शहरात पुन्हा एक ३८ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संबंधित परिसराला सील करण्यात आले असून या परिसरातील जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
शहरातील मुल्लावाडा परिसरातील रुग्णास खोकला आणि ताप असल्याने चांदवड येथील डी.सी.एच.सी. केंद्र नेमिनाथ हॉस्पिटल येथे तपासणीसाठी आल्यावर त्याच्या आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने त्याला मालेगावच्या सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे त्याचा नमुना घेतला असता तो पॉझिटिव्ह आला.
सध्या तो रुग्ण मालेगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्या संपर्कातील हायरिस्क नातलगांना चांदवड येथे डीसीएचसी केंद्रात दाखल करून त्यांचे नमुने घेतले जाणार आहेत. दरम्यान, चांदवडचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी चांदवड शहरातील मुल्लावाडा परिसर व त्यांच्या आजूबाजूला असलेल्या श्रीरामरोड परिसरातील सर्व दुकाने रविवारपासूनच बंद ठेवली आहेत व हा एरिया कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. मुल्लावाडा, चांदवड व बनकर मळा, लासलगावरोड, चांदवड कंटेन्मेंट झोनमधील शेवटचा रुग्ण बरा झाल्यानंतर पुढील २८ दिवसांपर्यंत ही बंधने लागू राहतील, असे आदेशात प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी म्हटले आहे.