कुलगुरू पदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 01:38 AM2021-07-05T01:38:06+5:302021-07-05T01:39:14+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या प्रक्रियेअंतर्गत राजभवनातून ५ उमेदवारांना सोमवारी (दि. ५) मुलाखतीसाठी बोलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या उमेदवारांच्या मुलाखती घेणार असून या मुलाखतींनंतर तत्काळ कुलगुरुपदासाठी उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या प्रक्रियेअंतर्गत राजभवनातून ५ उमेदवारांना सोमवारी (दि. ५) मुलाखतीसाठी बोलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या उमेदवारांच्या मुलाखती घेणार असून या मुलाखतींनंतर तत्काळ कुलगुरुपदासाठी उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी निवड समितीने सुचविलेल्या ५ उमेदवारांमध्ये सैन्यदलातील आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या डॉ. माधुरी कानिटकर यांच्यासह डॉ. अजय चंदनवाले, डॉ. नितीन गंगणे, डॉ. आरती किनीकर व डॉ. दीपक राऊत यांचा समावेश आहे. सध्या आरोग्य विज्ञान विद्यापाठीचा प्रभारी कार्यभार सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांच्याकडे आहे. त्यामुळे उमेदवारांच्या मुलाखतीनंतर तत्काळ कुलगुरू पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन विद्यापीठाचा कार्यभार सोपविला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कुलगुरू पदासाठी अर्ज मागविण्यात आल्यानंतर देशभरातील सुमारे ३० उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यातून छाननीनंतर पात्र उमेदवारांच्या नावांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली होती. परंतु, पुन्हा या यादीत बदल करण्यात आल्यानंतर पात्र उमेदवारांना १९ व २० जूनला झालेल्या मुलाखतींसाठी आमंत्रित करण्यात आले होते. निवड समितीने या मुलाखतींनंतर यातील ५ उमेदवारांची अंतिम फेरीसाठी निवड करीत ती राज्यपालांना सोपविली असून सोमवारी राजभवन येथे त्यांच्या मुलाखती होणार आहेत.