नगरसूलला दहा हॉटेल्स सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 11:13 PM2021-03-17T23:13:10+5:302021-03-17T23:58:47+5:30
नगरसूल : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांचे व्यावसायिकांकडून उल्लंघन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी येथे बाजारपेठेची पाहणी केली असता कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहा हॉटेल्स सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली.

रात्री उशिरापर्यंत ग्रामपंचायतीकडून सदर कारवाई सुरू होती. नगरसूलला कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी येवला तालुक्यातील नगरसूलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी शिंदे यांनी बाजारपेठांसह हॉटेल्सलाही भेट दिली असता अनेक ठिकाणी कोरोनाविषयक नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले.
काही दुकानांत मास्क, सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचे आढळून आले तर काही दुकानांमध्ये प्लास्टिकचा जादा वापर, हॉटेल्समध्ये गर्दी, स्वच्छतेचा अभाव यांमुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे शिंदे यांनी संबंधित हॉटेल्स पुढील आदेश येईपर्यंत सीलबंद करण्याची कारवाई करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला केल्या. त्यानुसार, रात्री उशिरापर्यंत नगरसूलचे ग्रामविकास अधिकारी गोरख निकम, कर्मचारी मनोज गाडेकर, गलांडे हे सीलबंदची कारवाई करीत होते. कोणी हॉटेल्स उघडण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचाही इशारा देण्यात आला.
कोरोना उपाययोजनांचा आढावा
शिंदे यांनी पंचायत समितीत जाऊन कोविडबाबतचा आढावा घेतला व उपाययोजनेच्या सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार, गटविकास अधिकारी, साहाय्यक गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, साहाय्यक पोलीस निरीक्षक, आदी उपस्थित होते. याचबरोबर त्यांनी ह्यमाझी वसुंधराह्ण अभियानाच्या कामाची पाहणी केली.