ब्रिटनहून शहरात आलेल्या सर्वांचा शोध पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:52 AM2021-01-05T00:52:11+5:302021-01-05T00:52:50+5:30
नाशिकमध्ये ब्रिटनहून आलेल्या ९६ नागरिकांचा शोध लावण्यात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला अखेर यश आले आहे. त्यांच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आरोग्य विभागाला लागून राहिली आहे. दरम्यान, दोन पॉझिटिव्ह रुग्णांना अहवाल येईपर्यंत १५ दिवस रुग्णालयातच थांबावे लागणार आहे.
नाशिक : नाशिकमध्ये ब्रिटनहून आलेल्या ९६ नागरिकांचा शोध लावण्यात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला अखेर यश आले आहे. त्यांच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आरोग्य विभागाला लागून राहिली आहे. दरम्यान, दोन पॉझिटिव्ह रुग्णांना अहवाल येईपर्यंत १५ दिवस रुग्णालयातच थांबावे लागणार आहे.
ब्रिटनवरून पसरत असलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन राज्यात येऊ नये म्हणून राज्य शासनाने खबरदारी म्हणून ब्रिटनवरून महिनाभरात परतलेल्या प्रवाशांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात परत आलेले १२१ प्रवासी असून, त्यात महापालिका हद्दीतील ९६ प्रवाशांचा समावेश होता. या सर्व नागरिकांचा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून शोध घेतला जात होता. ८६ नागरिकांचे ट्रेसिंग करण्यात यश आले. मात्र १० जणांचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. अखेर या दहा जणांना शोधण्यात पालिकेला यश आले असून, त्यांचे ट्रेसिंग करण्यात आले आहे.
हा शोध सुरू असतानाच, दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या दोघांसह त्यांच्या संपर्कातील तीन असे एकूण पाच जणांचा स्वॅब अधिक तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल येण्यास १५ दिवस लागणार असल्याने त्यांना १५ दिवस रुग्णालयातच थांबण्याचे निर्देश वैद्यकीय विभागाने दिले आहेत.