गिरणा नदीपात्रात ‘त्या’ गोण्यांचा शोध, ललित पाटीलने डोंगर-दऱ्यांत दडविले १५ किलो ड्रग्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 05:47 AM2023-10-25T05:47:03+5:302023-10-25T05:48:09+5:30

नदीपात्र खोलवर असल्यामुळे पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही.

search of those sacks in girna riverbed lalit patil hid 15 kg of drugs in hills and valleys | गिरणा नदीपात्रात ‘त्या’ गोण्यांचा शोध, ललित पाटीलने डोंगर-दऱ्यांत दडविले १५ किलो ड्रग्ज

गिरणा नदीपात्रात ‘त्या’ गोण्यांचा शोध, ललित पाटीलने डोंगर-दऱ्यांत दडविले १५ किलो ड्रग्ज

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या गाडीचालकाने ड्रग्जच्या गोण्या नदीच्या पात्रात फेकल्याचा संशय आहे. मुंबई पोलिसांनी देवळा तालुक्यातील गिरणा नदीपात्रात शोधमोहीम राबविली. मंगळवार पहाटेपासून सायंकाळपर्यंत ही मोहीम सुरू होती. नदीपात्र खोलवर असल्यामुळे पोलिसांच्या हाती काहीही लागले नसले तरी आणखी १५ किलो ड्रग्ज डोंगर-दऱ्यांत दडविल्याची माहिती पुढे येत आहे.

ललितच्या गाडीचा चालक सचिन वाघ याने कोट्यवधी रुपये किमतीचे ड्रग्ज देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथील डोंगरावर तसेच देवळा व बागलाण तालुक्यातील सरहद्दीवरील असलेल्या लोहोणेर- ठेंगोडा गावालगत वाहणाऱ्या गिरणा नदीपात्रात फेकल्याचे मुंबई पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी देवळा पोलिसांच्या मदतीने पहाटे अंधारातच शोध मोहीम सुरू केली. रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे साकीनाका पोलिस ठाण्याचे एपीआय ए. बी. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी उशिरापर्यंत ड्रग्ज शोधण्याचे कार्य सुरू होते. नदीचे पात्र खोलवर असल्याने व दुर्गंधीमुळे पथकाच्या हाती काहीही लागले नाही.

मुंबई पोलिसांनी केले ड्रायव्हरला ‘कॅच’

नाशिक पोलिसांसह मुंबई पोलिसांचे पथक सचिन वाघच्या मागावर होते. दोन्ही पथके शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणात आघाडी घेत मुंबई पोलिसांच्या पथकाने सचिनला अगोदर ‘कॅच’ करण्यास यश मिळविले अन् त्याच्या चौकशीतून एमडीचा साठा नष्ट करण्याचा कसा प्रयत्न झाला, ही माहिती उघडकीस आली. पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललितला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ललित मुंबईसह पुणे आणि नाशिक पोलिसांनाही हवा आहे. पुणे पोलिसांनी ललितचा भाऊ भूषण पानपाटीलच्या मुसक्या नेपाळ सीमेजवळ बांधल्या तर या दोघांची मुख्य साथीदार ॲड. प्रज्ञा कांबळे हिला पुणे पोलिसांनी उचलले.

...म्हणून सचिनने लावली विल्हेवाट

ललित फरार झाल्यानंतर पोलिसांचा तपास नाशिकपर्यंत येऊन आपणदेखील सापडू, अशी भीती सचिनला होती. अंधेरी-साकीनाका पोलिसांनी ललित व भूषणचा शिंदेवाडी गावातील ड्रग्जचा कारखाना व नाशिक पोलिसांनी कच्च्या मालाचे गोदाम उद्ध्वस्त केले. यामुळे सचिन अंडरग्राउंड झाला. त्याने उर्वरित एमडीच्या दोन गोण्या लोहणेर- ठेंगोडाजवळ गिरणा नदीत टाकल्या व १५ किलो ड्रग्ज डोंगरदऱ्यांत दडविले.

कोणाचीही गय केली जाणार नाही

नाशिकमध्ये एखादा मोठा गुन्हा घडला तर त्याच्यावर मुंबई पोलिस कारवाई करू शकतात. एमडीचे महानायक (ललित पाटील) शिवसेनेचेच पदाधिकारी होते. एमडी प्रकाराची पाळेमुळे नष्ट करण्याचे काम आमचे सरकार करेल. कोणाचीही गय केली जाणार नाही. - गिरीश महाजन, मंत्री

 

Web Title: search of those sacks in girna riverbed lalit patil hid 15 kg of drugs in hills and valleys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.