तृषार्त वन्यजीव पाण्याच्या शोधात!
By admin | Published: February 8, 2017 11:10 PM2017-02-08T23:10:01+5:302017-02-08T23:10:12+5:30
व्यथा : हरीण, माकडांची नागरी वस्तीपर्यंत धाव
खामखेडा : चालू वर्षी वर्षी जरी मोठ्या प्रमाणात डोंगरावर पाऊस झाला असला तरी जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडल्याने वास्तव्यात असलेले बिबटे, तरस, लांडगे, वानर आदि हिंस्त्र प्राणी डोंगर पायथ्याशी असलेल्या मळ्यामधील शिवारात येऊ लागले आहेत.
खामखेडा गावच्या उत्तरेकडे भागामध्ये सावकी शिवार ते कळवण तालुक्यातील मोकभनगीपर्यंत डोंगराच्या पर्वतरांगा आहेत. या डोंगराच्या पर्वतरागांमध्ये तिळवण किल्ला आहे. त्या किल्ल्याजवळ खामखेडा गावाचे बुटीचे रान आहे. या रानात बुटीची विहीर राजेशाही काळात पाण्यासाठी प्रसिद्ध होती. या विहिरीला खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. या विहिरीत यापूर्वी भरपूर पाणी राहत असे. उन्हाळ्यात त्यामुळे या पाण्यावर वन्यप्राण्यांची तहान भागत असे. परंतु या विहिरीचे कठडे विहिरीत ढासळल्याने विहीर दगड व मातीने भरून आल्याने उन्हाळ्यात पाणी राहत नाही.
गेल्या पंधरा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याने दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी झाल्याने ज्या प्रमाणात जंगलतोड झाली त्या प्रमाणात नवीन वृक्षांची लागवड केली गेली नाही. आणि जी काही प्रमाणात वृक्ष लागवड झाली, त्याची पाण्याअभावी किंवा देखभालीअभावी जतन झाली नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी-कमी होत गेल्याने पाण्याची पातळी खोल गेल्याने डोंगरात साधारण डिसेंबर नंतर डोंगरात वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी नसते. या जंगलामध्ये पावसाळ्यातील डोंगर उतारावरील पाणी साचून ठेवण्याची व्यवस्था नसल्याने हे पाणी पावसाळ्यात वाहून जाते. या पर्वतरांगांमध्ये बिबट्याचे प्रभाव क्षेत्र आहे. आता डोंगर-दऱ्यांमधील पाण्याचे जलस्त्रोत आटल्याने डोंगरांमध्ये पाणी नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात डोंगर पायथ्याजवळील मळ्यातील वस्तीवर रात्रीच्या वेळेस येत आसल्याचे चित्र दिसून येत आहे. वनविभागाने या वन्यप्राण्यांसाठी डोंगरांमध्ये कोणत्याही प्रकारची पाण्यासाठी वनतळे तयार केली नाही.
त्यामुळे रात्रीच्या वेळेस हे वन्यप्राणी अंधार परिसरात भक्ष्य व पाण्याच्या शोधात फिरतात व सकाळी उजाडण्यापूर्वी पुन्हा डोंगराच्या कडेकपारीत विश्रांतीसाठी निघून जातात. (वार्ताहर )