सायझिंगप्रश्नी विशेष महासभेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:34 AM2018-07-29T00:34:03+5:302018-07-29T00:34:20+5:30
मालेगाव शहर पूर्णत: वस्त्रोद्योगावर अवलंबून असणारे शहर आहे. मात्र यंत्रमाग व्यवसायाला पूरक असलेल्या सायझिंग उद्योगावर मोठे संकट आले आहे. शहरास रोजगार उपलब्ध करत देणाऱ्या उद्योगास सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून संरक्षण देण्यासाठी विशेष महासभा बोलावून धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती मालेगाव पॉवरलूम सायझिंग बचाव कमिटीचे संयोजक माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी उर्दू मीडिया सेंटर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
आझादनगर : मालेगाव शहर पूर्णत: वस्त्रोद्योगावर अवलंबून असणारे शहर आहे. मात्र यंत्रमाग व्यवसायाला पूरक असलेल्या सायझिंग उद्योगावर मोठे संकट आले आहे. शहरास रोजगार उपलब्ध करत देणाऱ्या उद्योगास सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून संरक्षण देण्यासाठी विशेष महासभा बोलावून धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती मालेगाव पॉवरलूम सायझिंग बचाव कमिटीचे संयोजक माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी उर्दू मीडिया सेंटर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुफ्ती मोहंमद इस्माईल पुढे म्हणाले की, राज्यात यंत्रमागाचे शहर म्हणून मालेगाव शहराचा नावलौकिक आहे. देशात शेतीपश्चात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणारा व्यवसाय वस्त्रोद्योग आहे; मात्र काही दिवसांपासून वायुप्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण मंडळाद्वारे व सध्या मनपा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. १२५ सायझिंगवर संक्रांत आल्यास संपूर्ण यंत्रमाग व्यवसाय ठप्प होईल व मजुरांवर उपासमारीची वेळ येईल म्हणून याकडे सहानुभूतीपूर्वक पाहता त्यांना संरक्षण देण्यासाठी मनपाने विशेष महासभा बोलवून निर्णय घेणे गरजेचे आहे. मालेगाव पॉवरलूम सायझिंग बचाव कमिटीचे संयोजक तथा महागठबंधनचे गटनेता बुलंद एकबाल म्हणाले की, सायझिंग उद्योगावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ आठ दिवस असोसिएशन बंद पाळला. त्यामुळे संपूर्ण यंत्रमाग व्यवसाय ठप्प झाले होते. यावेळी नगरसेवक एजाज बेग, अतिक कमाल, तनवीर अहमद जुल्फेकार, हनीफ साबीर, नगरसेवक अमानतुल्ला पीर मोहंमद, जुल्फेखार अहमद, मो. अब्दुल्ला मो. इस्माईल यांच्यासह कमिटीचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
सायझिंग असोसिएशनची बैठक
सायझिंग असोसिएशनच्या बैठकीत प्रदूषण निर्माण करणाºया पदार्थ वापरण्याच्या विरोधात निर्णय घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तथापि प्रदूषणाच्या नामोल्लेखाली सुरू झालेली कारवाई परवानगी व ना हरकतच्या नावाखाली मनपाकडे वळण घेतले आहे. अशा परिस्थितीत मनपाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला नाही तर शहराचा मुख्य उद्योग संपुष्टात येईल म्हणून सद्यस्थितीतील एम.आर.टी.पी. नवीन संशोधन अधिनियमाप्रमाणे सर्व सायझिंग युनिटला सामावून घेत मनपाने कायदेशीर संरक्षण द्यावे यासाठी विशेष महासभा बोलवण्यासाठी मनपाला पत्र दिले आहे.