मोसम, गिरणा नदीला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:50 AM2019-08-10T00:50:01+5:302019-08-10T00:50:27+5:30
कसमादे परिसरातील चणकापूर, हरणबारी, पुनंद, केळझर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणातील पाणीसाठा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चणकापूर व पुनंद धरणातून गिरणा नदीपात्रात, तर हरणबारी धरणातून मोसम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मालेगाव : कसमादे परिसरातील चणकापूर, हरणबारी, पुनंद, केळझर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणातील पाणीसाठा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चणकापूर व पुनंद धरणातून गिरणा नदीपात्रात, तर हरणबारी धरणातून मोसम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गिरणा व मोसम नदीला पूर आला आहे. प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या आठवडाभरापासून कसमादे परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. दररोज होत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खरीप पिकांना दिलासा मिळाला असला तरी सततच्या पावसामुळे उत्पादनात घट होण्याची चिन्हे दिसत आहे.
शुक्रवारी चणकापूर धरणातून ६ हजार ४८१, पुनंद धरणातून ४ हजार ३७८ क्यूसेक, तर केळझर धरणातून २ हजार १२ क्यूसेक असे एकूण १२ हजार ९७१ क्यूसेक पाणी गिरणापात्रात सोडण्यात आले आहे.
हरणबारी धरणातून मोसम नदीत ४ हजार २८१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. परिणामी गिरणा व मोसम नदीला
पूरस्थिती कायम आहे. गिरणा नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत
आहे.
यामुळे नदीकाठावरील गावे व वाड्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज असल्याची माहिती तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे बस फेऱ्या रद्द
राज्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मालेगाव आगाराने मालेगाव-सुरत, मालेगाव-उनई या बसच्या फेºया रद्द केल्या आहेत. नाशिककडे जाणाºया प्रवाशांच्या संख्येत घट झाल्यामुळे शुक्रवारी नाशिकच्या दहा फेºया रद्द करण्यात आल्या होत्या. पावसाचा फटका आगाराला बसत असून, उत्पन्नात घट झाली आहे.