दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के
By Admin | Published: June 14, 2016 11:11 PM2016-06-14T23:11:39+5:302016-06-14T23:52:01+5:30
दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के
वणी : दिंडोरी तालुक्यातील दुर्गम भागात भूकंपाचे सौम्य धक्के बसले असून, रिस्टल स्केलवर त्याची तीव्रता २.० इतकी नोंदविली गेली आहे. जिल्ह्यातील कळवण व दिंडोरी या भागाला गेल्या काही वर्षांपासून भूकंपाचे धक्के बसत असले तरी, त्याची तीव्रता पाहता घाबरण्याचे कारण नसल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. भूकंपाचे सौम्य झटके बसल्याचा अहवाल मेरी संस्थेने दिला आहे.
वणी-सापुतारा रस्त्यावरील अंबानेर, पांडाणे, माळेदुमाला भागात दुपारी ४.५९ व ५ वाजून २ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती या भागातील रहिवाशांनी दिली. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही.
अंबानेर येथे चंद्रभान दुगजे दुपारी सोप्यावर झोपलेले असताना सोफा हलल्याचे त्यांना जाणवले, ते त्वरित सोप्यावरून उठून खाली उतरले. पांडाणे येथील किरण दुगजे यांनाही भूकंपाची हालचाल जाणवली. माळे दुमाला येथील सुनील कोराळे, बाळू महाले, साहेबराव वाघ, सचिन वाघ यांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. तीन मिनिटांच्या अंतरात पाच ते सहा सेकंदापर्यंत हे धक्के बसल्याची माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)