सलग दुसरी घटना : गॅस कटरने पुन्हा कापले ‘एटीएम’; ३२लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 01:35 PM2019-08-22T13:35:38+5:302019-08-22T13:38:59+5:30
काही महिन्यांपुर्वीच नांगरे पाटील यांनी रात्रीच्या पोलीस गस्तीसाठी सुमारे ५० वाहने रस्त्यावर उतरविल्याचा दावा केला होता; मात्र रात्रीची गुन्हेगारी थांबता थांबत नसल्याने गस्त कुणीकडे? असा प्रश्न नाशिकरांकडून उपस्थित केला जात आहे.
नाशिक : शहरामध्ये चोरट्यांनी चक्क गॅसकटरच हातात घेत मध्यरात्रीनंतर शहरातील एटीएम केंद्रे ‘टार्गेट’ करण्यास सुरूवात केल्याचे लागोपाठ घडलेल्या दोन घटनांमधून समोर आले आहे. नाशिकरोडनंतर मखमलाबाद गावातही चोरट्यांनी अशाचप्रकारे भारतीय स्टेट बॅँकेचे एटीएम गॅसकटरने कापून पहाटेच्या सुमारास ३१ लाख ७५ हजार रूपयांची रोकड हातोहात लंपास केल्याचे उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाला मात्र अद्याप या टोळीचा सुगावादेखील लागू शकलेला नाही.
नाशिक शहर व परिसरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस ठाण्यांपासून थेट उपआयुक्तांपर्यंत अंतर्गत बदल्या केल्या; मात्र गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यास अद्याप आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांच्या पोलीसप्रमुखांना यश आलेले नाही. नाशिकरोड येथील जेलरोड भागात असलेले भारतीय स्टेट बॅँकेचे एटीएम यंत्र चोरट्यांनी गॅस कटरने बुधवारी (दि.२१) गॅस कटरने कापून अवघ्या १६ मिनिटांत १३ लाखांची रोकड लांबविली. या घटनेचा तपास सुरू होत नाही तोच पुन्हा चोरट्यांनी गुरूवारी (दि.२२) पहाटेच्या सुमारास मखमलाबाद गावातील स्टेट बॅँकेचेच एटीएम गॅस कटरने कापून सुमारे ३२ लाखांची रोकड लांबविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे रात्रीची पोलीस गस्तीविषयीदेखील शंका घेतली जात आहे. काही महिन्यांपुर्वीच नांगरे पाटील यांनी रात्रीच्या पोलीस गस्तीसाठी सुमारे ५० वाहने रस्त्यावर उतरविल्याचा दावा केला होता; मात्र रात्रीची गुन्हेगारी थांबता थांबत नसल्याने गस्त कुणीकडे? असा प्रश्न नाशिकरांकडून उपस्थित केला जात आहे. रात्रीची पोलीस गस्त अधिक सक्षम करण्याची गरज असून गुन्हेगारांच्या टोळ्या ऐन सण-उत्सवाच्या तोंडावर शहरात पुन्हा सक्रीय होऊ लागल्याने नागरिकांमध्ये संताप व भीती व्यक्त केली जात आहे.