नाशकात आढळला दुसरा कोरोनाबाधित रुग्ण आरोग्य यंत्रणेची धावपळ : दिल्लीहून परतल्याचा प्रशासनाला संशय; चौदा जणांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 01:28 AM2020-04-07T01:28:59+5:302020-04-07T01:29:13+5:30
नाशिक : दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती सुधारत असतानाच दोन दिवसांपासून मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सोमवारी (दि. ६) आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली.
नाशिक : दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती सुधारत असतानाच दोन दिवसांपासून मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सोमवारी (दि. ६) आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. शहरातील उच्चभ्रू वस्तीत राहणारा हा रुग्ण अलीकडेच दिल्लीहून परतल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे त्याच्याशी संबंधित व्यक्ती, नातेवाइकांचा युद्धपातळीवर शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ५५ रुग्णांपैकी चौदा जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
एकीकडे अशी स्थिती असताना शनिवारी प्रकृतीच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या एका ४४ वर्षीय व्यक्तीचा नमुना पॉझिटिव्ह येऊन तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य यंत्रणा दक्ष झाली आहे. त्याला तातडीने स्वतंत्र कक्षात दाखल करून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार सुरू करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक, मित्र, हितचिंतकांचा शोध घेतला जात आहे. संशयिताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, पिंपळगाव बसवंत येथील भाजी बाजारात ग्रामस्थांनी संचारबंदीचे गांभीर्य न बाळगता सोमवारी गर्दी करीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविल्याचे निदर्शनास येताच पोलीस प्रशासनाने बंदोबस्त कडक केला आहे.
पहिल्या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा
नाशिक जिल्ह्यात कोरोनासदृश लक्षणांवरून आजवर दाखल करण्यात आलेल्या २२१ रुग्णांपैकी १७३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आरोग्य यंत्रणा काहीशी निर्धास्त होती. मात्र दहा दिवसांपूर्वी ग्रामीण भागातील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. सदर रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सुधारत असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले.