नाशकात रंगणार दुसरी खो खो प्रीमिअर लीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:45 AM2021-01-08T04:45:02+5:302021-01-08T04:45:02+5:30
नाशिक : जिल्हा खो खो संघटनेच्या वतीने दि. ८ ते १० जानेवारीदरम्यान शहरात महाराष्ट्रातील दुसरी खो खो प्रीमिअर लीग ...
नाशिक : जिल्हा खो खो संघटनेच्या वतीने दि. ८ ते १० जानेवारीदरम्यान शहरात महाराष्ट्रातील दुसरी खो खो प्रीमिअर लीग आयोजित करण्यात आली आहे. खेळाडूंची तीन मुलांच्या व तीन मुलींच्या संघामध्ये विभागणी करण्यात आली असून, काही नवीन नियमांचादेखील त्यात अंतर्भाव करण्यात आला आहे.
आदिवासी व जिल्हा परिषद शाळेतील खो खो खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यत्वे या लीगचे आयोजन करण्यात आले आहे. खो खोच्या सामन्यात ९ मिनिटांचे चार डाव असतात, त्याऐवजी या स्पर्धेत ६ मिनिटांच्या तीन डावांचा एक सामना खेळवला जाणार आहे. तसेच गुणपत्रिकेवर प्रत्येक डावात किती खो दिले व किती नियमांचे उल्लंघन झाले असा स्वतंत्र उल्लेख असलेले गुणपत्रक या स्पर्धेसाठी तयार करण्यात आले आहे. दोन्हीही गटांत राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंचा सहभाग राहणार आहे. त्यात भरत पुरस्कार विजेता चंदू चावरे व वीर अभिमन्यू पुरस्कार विजेता दिलीप खांडवीसह मनोज पवार, संजय गावीत, वनराज जाधव, गणेश राठोड, चिंतामण चौधरी, भगवान गवळी, यशवंत वाघमारे असे राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा समावेश आहे.
मुलींच्या संघात निशा वैजल, सोनाली पवार, मनीषा पडेर व राज्य विजेत्या संघातील कौशल्या पवार, सरिता दिवा, वृषाली भोये, दीपिका बोरसे, ऋतुजा सहारे, सुषमा चौधरी, ताई पवार, विद्या मिरके या अव्वल दर्जाच्या खो खोपटू स्पर्धेत उतरणार आहेत . या लीगमध्ये प्रत्येक सत्रात दोन सामने असे सहा सत्रात १२ सामने खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धा सकाळी ८ ते ९:३० व संध्याकाळी ५ ते ७:३० अशा दोन्ही सत्रांमध्ये होणार आहेत.