नाशकातून किसानसभेचे दुसरे पथक दिल्लीच्या दिशेने रवाना शेतकरी आंदोलनाला देणार बळ : अमरावती, नागपूरमार्गे राजधानीकडे करणार कूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 06:22 PM2021-01-02T18:22:06+5:302021-01-03T00:48:55+5:30
नाशिक : केंद्र सरकाने आणलेले नवीन कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला घेराव घालीत गेल्या ३६ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला ठिंबा देण्यासाठी नाशिकमधून किसानसभेचे दुसरे पथक शनिवारी (दि.२) दिल्लीकडे रवाना झाले आहे
नाशिक : केंद्र सरकाने आणलेले नवीन कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला घेराव घालीत गेल्या ३६ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला ठिंबा देण्यासाठी नाशिकमधून किसानसभेचे दुसरे पथक शनिवारी (दि.२) दिल्लीकडे रवाना झाले आहे. यात नाशिकसह मुंबई, रायगड आणि पालघरमधील आंदोलकांचाही समावेश असून, हे पथक नाशिकमधून अमरावतीमार्गे नागपूरमध्ये दाखल होणार आहे. नागपूरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील किसानसभेचे आंदोलक दाखल होणार असून, रविवारी (दि.३) एकत्रितरीत्या दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहे.
किसानसभेच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलकांचे पहिले पथक नाशिकमधून दिल्लीकडे रवाना झाल्यानंतर, आता दुसरे पथक नागपूरहून दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहे. त्यासाठी नाशिकमधील आंदोलक शेतकरी शनिवारी (दि.२) गोल्फ क्लब मैदान येथून दुपारी दोन वाजेच्या सुमारास दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. किसान सभेच्या नेतृत्वात नाशिक शहरातील परिवर्तन वादी पक्ष ,संघटना पदाधिकारी शेतकऱ्यांच्या पथकाला पाठिंबा देण्यासाठी गोल्फ क्लब मैदानावर उपस्थित होते. दुसऱ्या टप्प्यात नाशिकहून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी आंदोलकांच्या पथकाचे नेतृत्व किसान सभेचे राज्यसचिव राजू देसले करणार असून, त्यांच्या समवेत भाकपचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी उपस्थित राहणार आहेत.
इन्फो -१
केंद्र सरकारने आणलेले नवीन कृषी उत्पादन, विपणन व व्यापारसंबंधी कायेदे शेतकरी विरोधी असून, हे कायदे रद्द करा. त्याचप्रमाणे, प्रस्तावित वीजबिल विधेयकही रद्द करा, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील शेतकरी दिल्ली येथे सुरू असलेले आंदोलनात लढणाऱ्या शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वात नाशिकहून निघाले आहेत. या आंदोलकांचे पिंपळगाव बंसवंत, चांदवड येथील शेतकरी स्वागत करणार आहे. त्याचप्रमाणे, धुळे येथे सभा झाल्यानंतर रात्री अमरावतीत मोजरी येथे मुक्कामाचे नियोजन करण्यात आले आहे.
इन्फो- २
आंदोलनक अमरावतीतून ३ जानेवारीला सकाळी निघून दुपारी दोन वाजेच्या सुमारास नागपूरमध्ये दाखल होणार आहेत. या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव अतुल कुमार अंजान यांची सभा होणार आहे. नागपूर येथे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गट एकत्रित येऊन दिल्लीकडे कूच करणार असून, यात मराठवाड्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे विधवा महिलाही सहभागी होणार आहे.
इन्फो-३
प्रवासमार्गात भोजन व्यवस्था, कोरडा शिधाही सोबत
नाशिकमधून दिल्लीच्या दिशेने कूच करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था प्रवासमार्गातील शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांसह देशभरातील शेतकऱ्यांच्या भोजनाची सोय वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि गुरुद्वारांकडून केली जात आहे. असे असले, तरी नाशिकमधून दिल्लीकडे रवाना होताना आंदोलकांनी संपर्ण प्रवासात आणि दिल्लीतही काही दिवस पुरेल, असा कोरडा शिधा सोबत नेला आहे.