दुसरा ऑक्सिजन प्लांट लवकरच साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:30+5:302021-06-16T04:18:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर: पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून तालुका सावरत असतांनाच संभाव्य तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन टंचाई भासू नये यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर: पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून तालुका सावरत असतांनाच संभाव्य तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन टंचाई भासू नये यासाठी सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात लवकरच दुसरा ऑक्सिजन प्लांट तयार होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सिन्नर तालुक्यात फारशी ऑक्सिजन टंचाई भासली नसली तरी संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर तालुका परिपूर्ण असावा यासाठी नियोजन केले जात आहे. आरोग्य विभागही तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाला आहे.
सिन्नर तालुक्यात ग्रामीण रुग्णालय व इंडिया बुल्स ही दोन शासकीय कोविड सेंटर आहेत. तर अन्य दहा खासगी कोविड रुग्णालये आहेत. सिन्नर ग्रामीण रुग्णालयात १०० ऑक्सिजन बेड आहेत तर खासगी रुग्णालयांमध्येही ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे. सध्या कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्याने ऑक्सिजन बेडही रिकामे आहेत. सिन्नर तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती करणारे माळेगाव आणि मुसळगाव औद्योगिक वसाहतीत पाच कारखाने आहेत. त्यामुळे सिन्नरच्या शासकीय व खासगी रुग्णालयांना दुसऱ्या लाटेतही ऑक्सिजनची कमतरता भासली नाही. एक वेळ ऑक्सिजनचा कच्चा माल (लिक्विड) संपत आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ऑक्सिजन ट्रेन नाशिकला आल्यानंतर त्यातील एक ऑक्सिजन टॅँकर सिन्नरला आल्याने वेळीच मदत झाली होती. नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात सिन्नर आणि निफाड या दोन ठिकाणी कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. तथापि, सिन्नर ग्रामीण रुग्णालयात प्रशस्त जागा असल्याने फारशी अडचण निर्माण झाली नाही. या रुग्णालयात सिन्नरसह शेजारी नाशिक, निफाड, दिंडोरी, इगतपुरी या तालुक्यातीलही रुग्णांवर उपचार करता आले. या काळातही सिन्नरला ऑक्सिजनची फारशी कमतरता जाणवली नाही. गेल्या महिन्यात खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेना नेते उदय सांगळे यांच्या पुढाकारातून बिल्डर्स असोसिएशन यांच्या सौजन्याने स्वयं निर्मित ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली. या ऑक्सिजन प्लांटमुळे दररोज ४० ऑक्सिजन बेडला ऑक्सिजन पुरेल इतका ऑक्सिजन स्वयंनिर्मित होत असल्याने ऑक्सिजनची टंचाई भासत नसल्याचे चित्र आहे. येत्या आठवड्याभराच्या आत सिन्नरला दुसरा ऑक्सिजन प्लांट तयार होत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सदर ऑक्सिजन प्लांटची निर्मिती होत आहे. या प्रस्तावित ऑक्सिजन प्लांटमुळे सिन्नर ग्रामीण रुग्णालय ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे. सिन्नरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, सिन्नर नगरपरिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार, नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील, डॉ. गरुड यांच्यासह वैद्यकीय अधिकारी तिसऱ्या लाटेसाठी सज्ज झाले असून संभाव्य लाट येऊ नये अशीच अपेक्षा बाळगली जात आहे.
चौकट-
बालरोगतज्ज्ञांची बैठक
संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना बाधा होण्याची शक्यता गृहीत धरुन सिन्नरच्या आरोग्य विभागाने शहरातील सहा बालरोग तज्ज्ञांची बैठक घेतली. बालरोग तज्ज्ञांनी शासनाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रत्येक बालरोग तज्ज्ञ त्यांच्या रुग्णालयात खासगी १५ ते २० बेडची व्यवस्था करणार आहेत. याशिवाय सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात बालकांसाठी ५० बेडचे अतिदक्षता विभाग सुरु केले जाणार आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यात १५० पेक्षा जास्त बालकांसाठी बेडचे नियोजन करण्यात आले आहे. इंडिया बुल्स येथील कोविड सेंटरमध्ये बालकांसाठी विलगीकरणाची व्यवस्था केली जाणार आहे.
कोट...
संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सिन्नरचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ग्रामीण रुग्णालयात बालकांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. बालरोग तज्ज्ञांची बैठक घेण्यात आली. त्यांनी पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. बालकांसाठी ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सिन्नरला यापूर्वी ऑक्सिजनची कमरता भासली नाही. सिन्नरला लवकरच दुसरा ऑक्सिजन प्लांट होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची कमरता यापुढेही भासणार नाही.
- डॉ. वर्षा लहाडे, वैद्यकीय अधीक्षक, सिन्नर ग्रामीण रुग्णालय.
चौकट-
सिन्नर तालुक्याची ऑक्सिजनची परिस्थिती..
सिन्नर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट- ०१
प्रस्तावित ऑक्सिजन प्लांट-०१
सिन्नर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड संख्या-१००
ऑक्सिजन व्यवस्था असलेले खासगी कोविड सेंटर-१०
बालरोग तज्ज्ञ- ०६
फोटो ओळी - १५ सिन्नर ६
सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात बिल्डर्स असोसिएशनच्या सौजन्याने साकारण्यात आलेला ऑक्सिजन प्लांट.
फोटो - १५ वर्षा लहाडे
डॉ. वर्षा लहाडे, अधीक्षक, सिन्नर ग्रामीण रुग्णालय
===Photopath===
150621\15nsk_23_15062021_13.jpg~150621\15nsk_24_15062021_13.jpg
===Caption===
सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात बिल्डर्स असोशिएशनच्या सौजन्याने साकारण्यात आलेला ऑक्सिजन प्लांट. ~वर्षा लहाडे