दुसऱ्या पेपरला काठिन्य पातळी अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:16 AM2021-09-27T04:16:16+5:302021-09-27T04:16:16+5:30
नाशिक: दोन सत्रात झालेल्या सेट परीक्षेतील पहिला पेपर फारसा त्रासदायक नसला तरी दुसऱ्या सत्रातील पेपरने विद्यार्थ्यांची चांगलीच परीक्षा घेतली. ...
नाशिक: दोन सत्रात झालेल्या सेट परीक्षेतील पहिला पेपर फारसा त्रासदायक नसला तरी दुसऱ्या सत्रातील पेपरने विद्यार्थ्यांची चांगलीच परीक्षा घेतली. यंदा दुसऱ्या पेपरची काठिन्य पातळी अधिक असल्यामुळे उमेदवारांचे कौशल्यपणाला लागले. जिल्ह्यातील १६ परीक्षा केंद्रांवर सुमारे ५,९२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्वच केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पाडल्याची माहिती केंद्र समन्वयकांनी दिली.
कोविडच्या संसर्गामुळे लांबलेली सेट परीक्षा रविवारी पार पडली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात परीक्षेचे आयेाजन करण्यात आले होते. त्यानंतर आता सप्टेंबरमध्ये परीक्षा पार पडली. खरेतर वर्षातून दोनदा परीक्षा होत असल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्येदेखील परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेतल्या गेलेल्या राज्यस्तरीय पात्रता चाचणी (सेट) परीक्षा जिल्ह्यातील सोळा परीक्षा केंद्रांवर झाली. जिल्ह्यातून ७,०८६ परीक्षार्थी होते त्यापैकी ५,९२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
दोन सत्रात झालेल्या परीक्षेत सकाळी दहा वाजता पहिला पेपर झाला तर एक तासाच्या अंतराने दुसरा पेपर साडेअकरा ते दुपारी दीड या वेळेत पार पडला. परीक्षेत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आली नसल्याचा दावा समन्वयकांनी केला तर पहिला पेपर सोपा असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. दुसऱ्या पेपरला मात्र चांगलाच कस लागला. काठिन्य पातळी वाढल्या पेपर सोडविण्यास वेळही लागला. अनेकांची अखेरच्या अर्ध्या तासातच दमछाक झाली. महाराष्ट्रासह गोवा राज्यात सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी ९६ हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते.