चार नगरपंचायतींचा दुसरा टप्पा आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 12:42 AM2021-12-29T00:42:27+5:302021-12-29T00:42:45+5:30
ओबीसी आरक्षणामुळे स्थगित केलेल्या जिल्ह्यातील निफाड, कळवण, देवळा व दिंडोरी या चार नगरपंचायतींच्या ११ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर हरकती न आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या (दि.२९) पासून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू होत असल्याने राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग येण्याची चिन्हे आहेत.
नाशिक : ओबीसी आरक्षणामुळे स्थगित केलेल्या जिल्ह्यातील निफाड, कळवण, देवळा व दिंडोरी या चार नगरपंचायतींच्या ११ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर हरकती न आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या (दि.२९) पासून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू होत असल्याने राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग येण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीचा पहिला टप्पा दि. २१ डिसेंबर रोजी मतदान घेऊन पार पडला होता. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून निफाड ३, कळवण २, देवळा ४ व दिंडोरी नगर परिषदेच्या ११ प्रभागांची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आरक्षण रद्द करून उर्वरित प्रभागांसाठी दि. १८ जानेवारी रोजी मतदान घेऊन पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल एकत्ररीत्या दि. १९ जानेवारी रोजी जाहीर करण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली होती. त्यानुसार दि. २३ डिसेंबर रोजी ११ प्रभागांची सोडत काढण्यात आली होती. या चारही नगरपंचायतींमध्ये दि. २९ रोजी सकाळी ११ वाजेपासून दि. ३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाइटवर नामनिर्देशनपत्र उपलब्ध असणार असून याच कालावधीत ती स्वीकारण्यात येणार आहेत. नामनिर्देशनपत्र/अर्जांची छाननी दि. ४ रोजी सकाळी ११ वाजेपासून करण्यात येणार असून दि. १० रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत ठेवण्यात आली आहे. दि. ११ रोजी चिन्ह वाटप व दि. १८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून चारही नगरपंचायतींच्या सर्व जागांचे निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रमात जाहीर केले आहे.
इन्फो...
दिंडोरीत चिठ्ठी पद्धत
दिंडोरीतील प्रभाग ११ व १६ दोन प्रभागांची निवडणूक आरक्षणाच्या मुद्यावरून स्थगित करण्यात आली होती. तेथील दोन्ही जागा खुल्या झाल्याने त्यातील एक जागा महिला राखीव करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश श्रींगी यांच्या उपस्थितीत चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. त्यात प्रभाग ११ ही जागा महिला राखीव करण्यात आली.