जेईई मेन्सचा दुसरा टप्पा अनिश्चित काळासाठी लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 02:04 PM2020-04-01T14:04:31+5:302020-04-01T14:35:28+5:30
जेईई मेन्स परीक्षेचा पहिला टप्पा जानेवारी महिन्यात पार पडल्यानंतर एप्रिल महिन्यात होणारी दुसऱ्या टप्पयातील जेईई मेन्स नोव्हेल कोरोना या साथ आजाराच्या प्रभावामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
नाशिक : राष्ट्रीय स्तरावरील आयआयटी, एनआयटी यांसारख्या नामवंत संस्थांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य असलेली जेईई मेन्स परीक्षेचा पहिला टप्पा जानेवारी महिन्यात पार पडल्यानंतर एप्रिल महिन्यात होणारी दुसऱ्या टप्पयातील जेईई मेन्स नोव्हेल कोरोना या साथ आजाराच्या प्रभावामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए)जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात दहा हजार विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षा दिली. एनटीएतर्फे सोमवारी दि. ६ जानेवारी रोजी बी. अार्किटेक्चर या शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली प्रवेश परीक्षा घेण्यात अाली होती.
एनटीए तर्फे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जेईई मेन्स ही परीक्षा दोनदा घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षेला ७ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. वडाळा रोडवरील अायआॅन डिजीटल सेंटरवर ५७६०, संदीप फाऊंडेशन केंद्रावर २७६०, नाशिक टेस्टिंग एजन्सी या केंद्रावर ६०० तर जेअायटी काॅलेज केंद्रावर ९०० असे एकूण दहा हजारावर विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० तर दुपारी २.३० ते ५.३० अशा दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात अाली होती.पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल ३१ जानेवारी रोजी जाहीर झाला असून यात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे. जेईईचा मेन्सचा दुसरा टप्पा ५ एप्रिल, ७ ते ९ ११ एप्रिल रोजी नियोजित होता. परंतु संपूर्ण देशात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने दुसऱ्या टप्प्यातील जेईई मेन्स आता परिस्थिती सुधारणा होईपर्यंत अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेसाठी १ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२० या कालावधीत या परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती. त्यानुसार ऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना परिसथितीनुसार १५ एप्रिल नंतर हॉलतिकीट उपलब्ध होऊ शकणार असल्याची माहिती एनटीए तर्फे प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.