कृषी समितीच्या बैठकीकडे दुसऱ्यांदा अधिकाऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 01:11 AM2020-12-05T01:11:38+5:302020-12-05T01:13:08+5:30
जिल्हा परिषद कृषी समितीच्या सलग दोन महिने मासिक बैठकीकडे इतर खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्यामुळे सभापती संजय बनकर संतप्त झाले असून, सलग बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविल्याशिवाय या पुढे बैठकच न घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
नाशिक : जिल्हा परिषद कृषी समितीच्या सलग दोन महिने मासिक बैठकीकडे इतर खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्यामुळे सभापती संजय बनकर संतप्त झाले असून, सलग बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविल्याशिवाय या पुढे बैठकच न घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेसदेखील इतर खात्याच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी दांडी मारल्याची बाब उघडकीस येऊन अशा अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला होता हे विशेष.
कृषी समितीची ऑनलाइन बैठक शुक्रवारी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी सभापती संजय बनकर होते. बैठकीच्या प्रारंभीच ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या मासिक बैठकीत झालेल्या निर्णयाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळच्या सभेसाठीदेखील कृषी खात्याचे अधिकारी वगळता अन्य खात्याचे अधिकारी गैरहजर असल्याने सभापती बनकर यांनी संबंधित गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविण्याचे आदेश दिले होते. तथापि, नोव्हेंबरच्या बैठकीस गैरहजर असलेले अधिकारी शुक्रवारच्या (दि. ४) बैठकीसाठी उपस्थित नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सभापती बनकर यांनी नाराजी व्यक्त करून गैरहजर अधिकाऱ्यांचा निषेध करणारा ठराव मांडला व गैरहजर अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविण्याचे आदेश दिले. संबंधितांचा खुलासा येईपर्यंत कृषी समितीची सभा न घेण्याचा इशारा दिला. या बैठकीस सदस्य निलेश केदार, बलवीर कौर, ज्योती वागले, विलास अलबाड, मोतीराम दिवे, कामिनी चारोस्कर आदी सदस्य उपस्थित होते.
चौकट===
हे अधिकारी होते गैरहजर
कार्यकारी अभियंता कडवा कालवा विभाग, कार्यकारी अभियंता पालखेड, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, जिल्हा अग्रणी बँक, अधीक्षक अभियंता वीज, अधीक्षक अभियंता वीज हे अधिकारी बैठकीस गैरहजर होते.
चौकट====
इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी समिती सभेस उपस्थित राहणे बंधनकारक असतानाही एकाही सभेला या विभागाचे अधिकारी उपस्थित राहत नाहीत. याप्रकरणी विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्यात येईल.
-संजय बनकर, सभापती