राज्यात दुसऱ्यांदा आढळला साळींदरसारखा दिसणारा ‘हेजहॉग’ वन्यजीव
By अझहर शेख | Published: January 6, 2021 02:23 AM2021-01-06T02:23:38+5:302021-01-06T02:24:21+5:30
भारतातील गुजरातमध्ये प्रामुख्याने आढळणारा साळींदरसारखा दिसणारा ‘हेजहॉग’ हा वन्यप्राणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात प्रथमच आढळून आला. महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ असणारा हा वन्यप्राणी सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी नंदूरबार जिल्ह्यात आढळून आला होता. यानंतर पुन्हा शिरपूरमधील एका शेतात अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला.
नाशिक : भारतातील गुजरातमध्ये प्रामुख्याने आढळणारा साळींदरसारखा दिसणारा ‘हेजहॉग’ हा वन्यप्राणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात प्रथमच आढळून आला. महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ असणारा हा वन्यप्राणी सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी नंदूरबार जिल्ह्यात आढळून आला होता. यानंतर पुन्हा शिरपूरमधील एका शेतात अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला. या प्राण्याला वन्यजीवप्रेमींच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले.
साळींदरसारखा दिसणारा भारतीय हेजहॉग वन्यप्राणी महाराष्ट्रात यापूर्वी पुणे, नंदुरबारमध्ये आढळून आल्याचे सांगितले जाते. या वन्यप्राण्याबाबत वनविभागाकडेदेखील फारशी माहिती नाही. आढे गावातील धनंजय मुरलीधर मराठे यांच्या शेतात चारा कापणी सुरू असताना अचानकपणे हा वन्यप्राणी शेतमजुरांना नजरेस पडला. सुरुवातीला शेतमजुरांना हा साळींदरचे (सायाळ) पिल्लू वाटले. हे पिल्लू निपचित पडलेले होते. याबाबत त्यांनी तेथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश बारी यांना कळविले. बारी यांनी घटनास्थळी येऊन बघितले असता त्यांनी त्यास ओळखले.
हे साळींदर नसून ‘हेजहॉग’ हे दुर्मीळ वन्यजीव असल्याचे त्यांनी सांगितले. बारी यांनी त्वरित अनेर डॅम वन्यजीव अभयारण्याचे वनक्षेत्रपाल प्रदीप राैंदळ यांना कळविले. रौंदळ यांनी वनरक्षक मनोज पाटील, महेश करणकाळ, नेचर कॉन्झर्वेशन फोरमचे वन्यजीवप्रेमी अभिजित पाटील यांना सोबत घेत घटनास्थळ गाठले. बारी यांनी या दुर्मीळ वन्यजीवाला चार दिवस देखभालीखाली ठेवण्यास सांगितले.
शिरपूरचे सहायक वनसंरक्षक अमितराज जाधव यांच्या आदेशान्वये वनपाल नितीन बारेकर, पाटील यांनी या अतिदुर्मीळ प्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. नाशिक वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या अनेर डॅम वन्यजीव अभयारण्याच्या प्रशासनाकडून या प्राण्याची नोंद करण्यात आली आहे
नेचर कॉन्झर्वेशन फोरमकडून सुश्रूषा
अशक्तपणा आल्याने या वन्यप्राण्याला त्वरित नैसर्गिक अधिवासात न सोडता रौंदळ यांनी या प्राण्याच्या देखभालीची जबाबदारी फोरमकडे सोपविली. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी चार दिवस सुश्रुषा केल्यानंतर या पिल्लाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. पुन्हा बारी यांनी त्याला तपासून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यास हिरवा कंदील दिला.
अवघे ७०० ग्रॅम वजन
शिरपूरमध्ये आढळून आलेल्या या वन्यप्राण्याचे वजन अवघे ७००ग्रॅम इतके होते आणि त्याचे वयदेखील कमी असल्यामुळे त्याला भूक भागविणे अवघड झाल्याने कदाचित त्याला डिहायड्रेशन झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. हा प्राणी प्रामुख्याने लहान पाली, बेडूक, सरडे, साप, गांडूळ खाऊन गुजराण करतो. रात्रीच्या वेळी या प्राण्याची भक्ष्यासाठी हालचाल सुरू असते. हा प्राणी आकाराने लहान असतो.
.