मालेगावी कोरोनाचा दुसरा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 02:04 PM2020-04-11T14:04:59+5:302020-04-11T14:05:43+5:30
मालेगाव : शहरात शनिवारी कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. तर ११ रुग्ण कोरोना बाधीत (पॉझीटीव्ह) आढळून आल्याने येथील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
मालेगाव : शहरात शनिवारी कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. तर ११ रुग्ण कोरोना बाधीत (पॉझीटीव्ह) आढळून आल्याने येथील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. शहर पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. घराबाहेर रस्त्यावर व बाजारपेठांमध्ये पडून प्रशासनाला आव्हान देण्याचा प्रकार शहरात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक पाऊले उचलावीत अशी मागणी सामाजिककार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मालेगाव उत्तर महाराष्टÑातील कोरोना आजाराचे हॉटस्पॉट ठरु पाहत आहे. शहरात गेल्या गुरूवारी पाच पॉझीटीव्ह रुग्ण आढळले होते तर एकाचा बळी गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आलेल्या अहवालात अजुन पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले होते. शनिवारी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका २२ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर येथील महसुल, पोलीस, महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. शहराच्या पूर्व व पश्चिम बाजुला जोडणा-या पुलांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी शुक्रवारी रात्री संचारबंदीत वाढ केली आहे. शनिवार दि. ११ रोजी सकाळी ७ ते मंगळवार दि.१४ रोजी रात्री १२ पर्यंत शहर पूर्णपणे लॉकडाऊन ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संचारबंदी काळात पेट्रोलपंप, दूध, मेडिकल, रुग्णालये व इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. संचारबंदी काळात नागरिकांनी माक्स वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.