दुसऱ्या लाटेतही ‘मालेगाव पॅटर्न’ चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:14 AM2021-05-19T04:14:25+5:302021-05-19T04:14:25+5:30
गेल्या दोन आठवड्यांपासून मालेगाव शहरातील आठ व ग्रामीणचे दोन अशा दहा पोलीस ठाण्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या गेल्या १५ दिवसांपासून ...
गेल्या दोन आठवड्यांपासून मालेगाव शहरातील आठ व ग्रामीणचे दोन अशा दहा पोलीस ठाण्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या गेल्या १५ दिवसांपासून ५० पेक्षा कमी आढळून आली आहे. पूर्व भागातील नागरिकांमध्ये कोरोनाची भीती कमी झाली आहे. कोरोनाची लक्षणे जाणवताच मोहल्ला क्लिनिक, फॅमिली डॉक्टरांकडून तातडीने उपचार केले जात आहेत. पूर्व भागातील डॉक्टरही कोरोना बाधित रुग्णांशी बिनधास्त संवाद साधून वेळीच औषधोपचार करत आहेत. मालेगावच्या नाईट लाईफमुळे रुग्णालये २४ तास खुली असतात. शहरातील नागरिकांना तातडीने उपचार उपलब्ध होत असल्यामुळे गेल्या १५ दिवसांत रुग्णसंख्या कमालीची घटली आहे. गेल्या वर्षी मालेगाव पॅटर्न चर्चेला आला होता. यंदा कोरोनाची लाट भयावह असतानादेखील नागरिकांनी दाखविलेल्या सहकार्यामुळे जिल्ह्यात मालेगावची रुग्णसंख्या कमी आहे. येथील बडा कब्रस्थानात १ मे ते १६ मे दरम्यान १३८ दफनविधीची नोंद झाली आहे. तर गेल्या वर्षी मे महिन्यात ३४१ दफनविधी झाले होते. १३८ पैकी केवळ ८ ते १० मृत्यू कोरोना बाधितांचे आहेत. अन्य मृत्यू नैसर्गिक व इतर कारणांमुळे झाल्याचे नोंदींवरून दिसून येत आहे. आयेशा नगर कब्रस्तानात १ ते १५ मे दरम्यान ३८ दफनविधी झाले आहेत. यात फक्त एक कोरोना बाधित व अन्य आजाराने व नैसर्गिक कारणांमुळे ८ लहान मुले व २९ ज्येष्ठांचा मृत्यू झाल्याचे दिसून येते.
इन्फो
नियंत्रणाची ही आहेत कारणे...
रमजान पर्वानंतर कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र पाैष्टिक व सकस आहाराचे सेवन, यंत्रमाग कामगारांची मेहनत, पुरेसा आराम या गोष्टी कोरोनावर मात करण्यासाठी मालेगावी पोषक ठरत आहेत. शहरातील डॉक्टरांकडूनही कोरोनाची भीती नाहीशी करून रुग्णांच्या जवळ जात मानसिक आधार देऊन रुग्णांचे समुपदेशन केले जात आहे. परिणामी, भीतीचा आजार असणारा कोरोना मालेगावात नियंत्रणात आहे. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या कार्यक्षेत्रातील कोरोनाबाधित आकडेवारी बघता गेल्या १ मे रोजी एकूण ५१४ रुग्ण आढळून आले होते. तर १७ मे रोजी ११९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद आहे. रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. इतर खासगी रुग्णालयातील बाधित रुग्णांसह एकूण ४४४ रुग्णांवर उपचार केले जात आहे. आतापर्यंत २९३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
इन्फो
केंद्रनिहाय दाखल रुग्णसंख्या
सहारा हॉस्पिटल - ७६
मसगा - ४४
हज हाऊस - २१
सामान्य रुग्णालय - ९६
दिलावर हॉल - ०
इन्फो
गेल्या दहा दिवसांतील रुग्णसंख्येचा आलेख
८ मे - ३१६
९ मे - १९३
१० मे - ३२८
११ मे - २५२
१२ मे - १८६
१३ मे - २२५
१४ मे - १९७
१५ मे - ३३१
१६ मे - ८८
१७ मे - ११९