सलग दुसऱ्या वर्षी मॉन्टेसरीतील चिमुकल्यांची किलबिल थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:15 AM2021-05-27T04:15:09+5:302021-05-27T04:15:09+5:30
नाशिक : ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, जॉनी जॉनी एस पापा, तसेच हम्प्टी डम्प्टी... यांसारख्या कवितांच्या बोबड्या बोलातील किलबिलाटांनी गजबणाऱ्या ...
नाशिक : ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, जॉनी जॉनी एस पापा, तसेच हम्प्टी डम्प्टी... यांसारख्या कवितांच्या बोबड्या बोलातील किलबिलाटांनी गजबणाऱ्या मॉन्टेसरी, नर्सरी स्कूल यावर्षीदेखील बंदच राहणार आहेत. मागीलवर्षी कोरोनाच्या प्रभावामुळे मॉन्टेसरी उघडलीच नाही तर यंदाही तीच परिस्थिती आहे. तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक असल्याचे बाेलले जात असल्यामुळे नर्सरी बंदच राहणार आहेत. यातून बालकांचे नुकसान होणार असल्याने पालकांनाच मुलांना घरात शिकविण्याची वेळ येणार आहे.
यंदा शिक्षण क्षेत्रापुढे अनेक अडचणी आल्या असून, प्रवेशापासून परीक्षेपर्यंतची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक सत्र कसे असेल, याविषयी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा परिणाम केवळ प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच पदवी, पदव्युत्तर शिक्षणक्रमावरच झाला आहे, असे नाही तर मॉन्टेसरी, नर्सरीवरदेखील झाला आहे. शहरात व्यावसायिक तसेच खासगी स्वरूपात अनेक ठिकाणी नर्सरी सुरू आहेत. प्राथमिकच्या वर्गात प्रवेश घेण्यापूर्वी बालकांच्या मेंदुचा विकास मॉन्टेसरीत प्रगल्भ होतोच, शिवाय त्याच्या बुद्धिमत्तेला चालना देण्याचे कार्य घडत असते.
--इन्फो--
अडीच ते पाच वर्षांच्या बालकांचे काय
अडीच ते पाच वर्षांच्या बालकांना मॉन्टेसरीत दाखल केले जाते. साधारणपणे साडेपाच ते सहा वर्षांच्या बालकांना पहिलीत बाहेर प्रवेश मिळतो. त्यामुळे नर्सरीच्या शिक्षणालादेखील तितकेच महत्व असते. स्पर्धेच्या युगात तर चुणचुणीत मुलांना प्राथमिकला लागलीच प्रवेश मिळतो. यासाठी त्याच्या गुणात्मक विकासाला नर्सरी, मॉन्टेसरीतील शिक्षण महत्त्वाचे ठरते. गेल्या दोन वर्षांपासून नर्सरी बंदच असल्याने या कालावधीतील वयोगटातील मुलांचे वय वाढणार असल्याने त्यांच्या पहिलीच्या प्रवेशाची कसोटी लागणार आहे.
---कोट--
मुलांच्या मानसिकतेवर परिणाम; ही काळजी घ्या
या वयोगटात मानसशास्त्रीयदृट्या बालकांच्या सप्रेशन इंडिव्हिजवेशनवर परिणाम होऊ शकतो. मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, शाळेत जाऊ शकतो, ही महत्त्वाची मानसशास्त्रीय प्रक्रिया घडत असते. सामाजिक, मानसिक प्रकिया या काळात घडत असल्याने त्यांच्या व्यक्तीगत विकासावर परिणाम होऊ शकतो. शैक्षणिक नुकसान फार मोठे नसल्याने पालकांनीही उगाचच ऑनलाईनचाही आग्रह धरू नये, बालकांसाठी हे योग्यही नाही.
- डॉ. अमोल कुलकर्णी, बालमानसोपचार तज्ज्ञ
--केाट ---
वर्षभर कुलूप; यंदा?
मागीलवर्षी मॉन्टेसरी बंदच होती; यंदाही शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. तिसऱ्या लाटेची भीतीही पालकांमध्ये आहे. त्याचा परिणाम मात्र बालकांवर होणार आहे. त्यांची दोन वर्षे वाया गेल्याने त्यांना पुढील शैक्षणिक वर्षाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पालकांनी मॉन्टेसरी, नर्सरी शिक्षकांकडून टीप्स् घेऊन मुलांना रोज एक तास घरातच शिकविणे शक्य आहे.
- अनिता शिंदे, मॉन्टेसरी संचालक,
--इन्फो--
अडीच ते पाच वर्षांची बालके असल्यामुळे त्यांच्यावर या वयातच शैक्षणिक, सामाजिक संस्कार रूजत असतात. त्यामुळे या कालावधीतील बालकांचे नुकसान होणार आहे. केजीच्या मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्यात अडचणी आहेत. आताच या बालकांच्या हातात मोबाईल देणे योग्य होणार नाही. शिक्षक आणि पालकांनी समन्वयातून मार्ग काढणे अपेक्षित आहे.
- ज्योती दुसाने, नर्सरी संचालिका.
--इन्फो--
मुलांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास नर्सरीतच होतो. त्यामुळे यंदा या बालकांचे नुकसान होणार आहे. त्यांच्या या वयात शाळेची आवड निर्माण होते. अभ्यास तसेच कलागुणांची गोडी लागते. त्यामुळे या वयातील मुलांपुढे सामाजिक तसेच मानसिक प्रश्न निर्माण होऊ शकतो. पालकांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
मनीषा सोनवणे, मॉन्टेसरी संचालिका.
--कोट--
पालकही परेशान
मागील वर्षी मुलांना नर्सरीत पाठविता आले नाही. मुलांना नर्सरीत जाण्याची ओढ लागलेली आहे. परंतु त्यांना घरातच शिकविण्याची वेळ आलेली आहे. अनुकरणाचे वय असलेल्या या मुलांना घरातच ठेवणे योग्य वाटत नाही. परंतु आता तर काही इलाज नाही.
- अमीना शेख, पालक
यंदा मुलाला नर्सरीत पाठवायचे असल्याने सर्वांनाच उत्सुकता होती. परंतु कोरोनामुळे अजूनही अनिश्चितता असल्यामुळे यंदा कसे मुलांना शिकवावे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांना घरातच ठेवण्याची वेळ आल्याने त्यांच्या मानसिकतेची काळजी घ्यावी लागत आहे.
शोभा खैरनार, पालक
मागील वर्षी मुलांना नर्सरीत प्रवेशच घेता आला नाही. यंदाही अशीच परिस्थिती असल्याने आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे. या वयातच मुलांना चांगल्या शिक्षणाची आणि चांगल्या वातावरणाची सवय लागते. दोन वर्षे मुलांना घरात ठेवल्यामुळे काय परिणाम होतील, याची चिंता आहेच.
- अश्विनी शिंपी, पालक