सलग दुसऱ्या वर्षी ईदगाह मैदान राहणार सुनेसुने; बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 02:43 PM2021-07-20T14:43:06+5:302021-07-20T14:47:50+5:30
पवित्र हज यात्राही सौदी अरेबिया सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द करण्यात आली. हज यात्रा रद्द होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. बकरी ईद आणि हज यात्रा हे पारंपरिक धार्मिक समीकरण आहे. यंदा हज यात्रा रद्द झाल्याने समाजबांधवांचा हिरमोड झाला आहे.
नाशिक : रमजान ईदप्रमाणे बुधवारी (दि.२१) साजऱ्या होणाऱ्या ह्यईद-उल-अज्हाह्ण अर्थात बकरी ईदवरदेखी कोरोनाचे सावट असल्याने ऐतिहासिक ईदगाह मैदानावर होणारा सामुहिक विशेष नमाजपठणाचा सोहळा शासनाच्या आदेशान्वये रद्द करण्यात आल्याचे शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी जाहीर केले आहे. यामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी ईदगाह मैदान सुनेसुने राहणार आहे. दोन महिन्यांपुर्वी साजरी झालेल्या रमजान ईदचेही सामुहिक नमाजपठण ईदगाह मैदानावर करण्यात आले नव्हते.
शहरासह जिल्ह्यात सर्वत्र साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे. बुधवारी साजरी होणाऱ्या ईदनिमित्ताने मुस्लीम बांधवांकडून घरांमध्ये नमाज अदा करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. मशिदींमध्येसुध्दा प्रमुख मौलवींसह काही मोजक्याच लोकांना ईदचे नमाजपठण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे मशिदींमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन सर्व मशिदींच्या विश्वस्तांना पोलीस व जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सालाबादप्रमाणे यावर्षीही बकरी ईदचा सण पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. यासाठी समाजबांधवांची तयारी पुर्ण झाली आहे. शासन, प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी ईदच्या पार्श्वभुमीवर पार पडणारी पवित्र हज यात्राही सौदी अरेबिया सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द करण्यात आली. हज यात्रा रद्द होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. बकरी ईद आणि हज यात्रा हे पारंपरिक धार्मिक समीकरण आहे. यंदा हज यात्रा रद्द झाल्याने समाजबांधवांचा हिरमोड झाला आहे.
यंदा कोरोनामुळे बोकडांचा बाजारातही तेजी आलेली पहावयास मिळत आहे. बोकडांचा भावही वाढला आहे.
दाऊदी बोहरा बांधवांकडुन ईद साजरी
शहरातील दाऊदी बोहरा समाजबांधवांकडून नुकतीच बकरी ईद साजरी करण्यात आली. यावेळी टाकळीफाटा येथील कुतुबी मशिदीतून धर्मगुरु मुस्तुफा रशीद शेख यांचे प्रवचन यु-ट्युबवरुन लाइव्ह करण्यात आले. मशिदीमध्ये मोजक्याच प्रमुख विश्वस्तांकडून नमाजपठण करण्यात आले. नागरिकांनी आपआपल्या घरांमध्ये ईदची नमाज अदा केली. दरम्यान, एकमेकांना फोनवरुन तसेच सोशलमिडियाद्वारे संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या.