ब्रिटिशकालीन दारणा धरणाची सुरक्षा रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:31+5:302021-07-07T04:16:31+5:30
नांदूरवैद्य (किसन काजळे) : इगतपुरी तालुक्याची ओळख असलेल्या ब्रिटिशकालीन दारणा धरणाची सुरक्षा रामभरोसे असून दोनच कर्चचाऱ्यांवर भिस्त आहे. धरणाच्या ...
नांदूरवैद्य (किसन काजळे) : इगतपुरी तालुक्याची ओळख असलेल्या ब्रिटिशकालीन दारणा धरणाची सुरक्षा रामभरोसे असून दोनच कर्चचाऱ्यांवर भिस्त आहे. धरणाच्या मध्यभागी सरंक्षणाकरिता ब्रिटिशकाळात लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेट्स तुटून नादुरुस्त झाले आहेत.
इगतपुरी तालुक्यासह इतर जिल्ह्यासाठी भगीरथाप्रमाणे दारणा धरणाचे महत्त्व आहे. परंतु या धरणाची सुरक्षा रामभरोसे का, असा सवाल उपस्थित होत आहे. जलसंपदा विभाग याकडे लक्ष देणार कधी ? असा प्रश्न परिसरातील नागरिक तसेच पर्यटक करीत आहेत. जीवनवाहिनी ठरलेल्या धरणावर ब्रिटिशकाळात धरणाची सुरक्षा लक्षात घेऊन संरक्षणाच्या दृष्टीने ठिकठिकाणी लोखंडी मजबूत खांब आडवे टाकून सुरक्षाकवच तयार करण्यात आले होते. परंतु काही समाजकंटकांनी त्याची तोडफोड करत मजबूत खांब वाकवून नुकसान केले आहे. दारणा धरणाची एक बाजू ते दुसऱ्या बाजूपर्यंत कसलेले अंतर दोन किलोमीटर असून या संपूर्ण अंतरासाठी दारणा धरणावर फक्त दोनच सुरक्षारक्षक असल्यामुळे मध्यभागी असलेल्या महत्त्वाच्या जागी सुरक्षेचा प्रश्न उभा राहत असल्याने या धरणाची सुरक्षा ऐरणीवर आली असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
---------------------
पथदीप बंद
धरण परिसरात लावण्यात आलेले पथदीप देखील अनेक दिवसांपासून बंद आहेत. धरणावर रात्रीच्या वेळी कोण येते, कोण जाते याची नोंद देखील होत नसल्यामुळे या ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. जलसंपदा विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दारणा धरणाची सुरक्षा अबाधित राहण्यासाठी तातडीने दुरूस्ती करण्यात यावी तसेच बंद स्थितीत असलेले पथदीप त्वरित सुरू करण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
--------------------
महाराष्ट्रात ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाची एक वेगळीच ओळख आहे. याच दारणा धरणाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याने येथे सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेले लोखंडी बॅरिकेटस तुटून पडले असून पथदीप देखील बंद असल्यामुळे दारणा धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नादुरुस्त बॅरिकेटस दुरुस्ती करण्यात यावी व पथदीपांची सोय करण्यात यावी यामुळे पर्यटनाला वाव मिळेल.
- गणेश मुसळे, विधानसभा अध्यक्ष, मनसे, इगतपुरी तालुका
----------------------------
इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिकालीन दारणा धरणाचे तुटलेल्या अवस्थेतील संरक्षक खांब. (०६ दारणा १/२/३)
060721\06nsk_2_06072021_13.jpg
०६ दारणा १/२/३