सुरक्षारक्षकांनी महिलांना मुलांसह उद्यानात अडकविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:30 AM2019-05-30T00:30:36+5:302019-05-30T00:31:05+5:30
गंगापूररोडवरील पंपिंगस्टेशन परिसरात महापालिकेने उभारलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व संग्रहालय परिसरात मंगळवारी (दि.२८) सायंकाळी पावणे आठ वाजेपासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरक्षारक्षकांनी तीन महिलांना पाच ते सहा मुलांसह आतमध्ये अडकवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक : गंगापूररोडवरील पंपिंगस्टेशन परिसरात महापालिकेने उभारलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व संग्रहालय परिसरात मंगळवारी (दि.२८) सायंकाळी पावणे आठ वाजेपासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरक्षारक्षकांनी तीन महिलांना पाच ते सहा मुलांसह आतमध्ये अडकवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी किरण बाजीराव कापसे यांनी सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरील उद्यानाशेजारी असलेल्या सोमनाथ पार्कमध्ये कापसे हे कुटुंबीयांसमवेत राहतात. त्यांचे कुटुंबीय परिसरातील महिला व मुले महापालिकेने ठरवून दिलेले शुल्काची रक्कम सुरक्षारक्षकांकडे रीतसर जमा करून तिक ीट घेऊन उद्यानामध्ये गेले होते. यामध्ये कापसे यांच्या पत्नीसह मुलांचाही समावेश होता. दरम्यान, सव्वाआठ वाजेच्या सुमारास कापसे यांच्या मुलीने जोरात आरडाओरड केल्याने ते घराबाहेर आले व त्यांनी उद्यानाकडे धाव घेतली असता मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले होते. त्यांनी येथील सुरक्षारक्षकांना विनंती करत आतमध्ये मुले, महिला अडकल्या असून, प्रवेशद्वार उघडण्यास सांगितले, मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना न जुमानता उद्धट भाषेत ‘प्रवेशद्वाराचे कुलूप उघडणार नाही, तुला काय करायचे ते कर’ असे सुनावल्याचे कापसे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
दरम्यान, कापसे यांनी तत्काळ गंगापूर पोलीस ठाण्यात संपर्क साधून घडला प्रकार कथन करत मदत मागितली. यावेळी कुलूप उघडत नसल्यामुळे उद्यानात अडकून पडलेली लहान मुले जोरजोराने रडू लागली होती. तरीदेखील सुरक्षारक्षकांनी उद्यानाचे कुलूप उघडले नाही आणि उद्यानातील विद्युतव्यवस्थाही बंद करण्यात आली होती.
या प्रकारामुळे महिला, मुले खूप घाबरून गेले. साडेनऊ वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी सुरक्षारक्षकांना प्रवेशद्वाराचे कुलूप उघडण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी कुलूप उघडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कापसे यांच्या तक्रारीवरून दोन्ही सुरक्षारक्षकांविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.