सुरक्षा ‘सोमेश्वर’ भरोसे : ‘दूधसागर’ धबधब्याभोवती हवे संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 09:37 PM2018-08-21T21:37:08+5:302018-08-21T21:39:30+5:30
दूधसागर धबधब्याच्या परिसरात असलेल्या गोदापात्रातील खडकांवर उभे राहून पर्यटक फोटो काढताना दिसतात. कारण पायवाटेपासून थेट गोदापात्रात जाता येते. येथे कु ठल्याहीप्रकारचे संरक्षण कुंपण उभारण्यात महापालिकेला यश आलेले नाही.
नाशिक : शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर गंगापूर गावाच्या शिवारात असलेल्या बालाजी मंदिरालगत ‘दूधसागर’ धबधबा सध्या खळाळून वाहत आहे. नाशिककरांच्या पसंतीचे जवळचे ‘डेस्टिनेशन’ असलेला दूधसागर धबधब्याचा परिसर वर्षानुवर्षांपासून असुरक्षितच राहिला आहे. धबधब्याभोवती संरक्षक कुंपण उभारण्याची गरज आहे. फोटोसेशनसाठी पर्यटक बेभानपणे धबधब्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
दूधसागर धबधब्याच्या परिसरात असलेल्या गोदापात्रातील खडकांवर उभे राहून पर्यटक फोटो काढताना दिसतात. कारण पायवाटेपासून थेट गोदापात्रात जाता येते. येथे कु ठल्याहीप्रकारचे संरक्षण कुंपण उभारण्यात महापालिकेला यश आलेले नाही. दूधसागर धबधब्याच्या परिसरात विकासकामांची खरी गरज आहे, तरच या पर्यटनस्थळाचा नावलौकिक वाढेल. या धबधब्याच्या आवारात बालाजी मंदिराचा परिसर वगळता स्वच्छतागृहही महापालिकेचे उपलब्ध नाही. त्यामुळे आलेल्या पर्यटकांची मोठी कुचंबना होते. याचा सर्वाधिक त्रास महिलावर्गाला होतो. महापालिकेने येथील जवळच असलेल्या गोदावरी परिचय उद्यानात अद्ययावत व पाण्याच्या मुबलक व्यवस्थेसह प्रसाधनगृह उभारण्याची मागणी होत आहे.