वनौषधी उद्यानाची सुरक्षा धोक्यात
By admin | Published: May 23, 2017 01:22 AM2017-05-23T01:22:56+5:302017-05-23T01:23:14+5:30
उपनगर : फुलसुंदर इस्टेट परिसरातील मनपाच्या वनौषधी उद्यानांची वर्षभरापूर्वी कोसळलेली संरक्षक भिंत अद्यापही तशीच असल्याने उद्यानामधील विविध दुर्मीळ प्रजातींच्या वृक्षांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उपनगर : फुलसुंदर इस्टेट परिसरातील मनपाच्या वनौषधी उद्यानांची वर्षभरापूर्वी कोसळलेली संरक्षक भिंत अद्यापही तशीच असल्याने उद्यानामधील विविध दुर्मीळ प्रजातींच्या वृक्षांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. फुलसुंदर इस्टेट येथे मनपाच्या मोकळ्या भूखंडावर वृक्षमित्र शेखर गायकवाड यांच्या पुढाकाराने वनौषधी उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे. १०० हून अधिक दुर्मिळ अशा वृक्षांची लागवड या उद्यानात करण्यात आली आहे. गेल्या पावसाळ्यात उद्यानाची संरक्षक दगडी भिंत पावसामुळे वाहुन गेली होती. वर्ष उलटुनही मनपाने वनौषधी उद्यानाच्या संरक्षक भिंत उभारण्याकडे लक्ष न दिल्याने जैसे थे परिस्थिती आहे. यामुळे उद्यानांत जनावरांचा वावर वाढला असून भुरट्या चोरांचा अड्डा झाला आहे. संरक्षक भिंत तुटल्याने भुरट्या चोरांनी या ठिकाणच्या संरक्षक जाळ्या, पाण्याचे लोखंडी बॅरल व बागकामाच साहित्य चोरून नेले आहे. वृक्षप्रेमी व परिसरातील रहिवाशांनी मोठ्या कष्टाने जोपासलेल्या या वनौषधी उद्यानांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मनपा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन वनौषधी उद्यानाची संरक्षक भिंत त्वरित उभारावी अशी मागणी वृक्षमित्र व परिसरातील रहिवाशांनी केली आहे.